मुंबई, दि. 31 - मुंबईतील जे. जे. मार्ग परिसरात पाच मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. गुरुवारी ( 31 ऑगस्ट ) सकाळी ही घटना घडली. भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनी नावाची इमारत कोसळून अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली 60 ते 65 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. या दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये एकूण 9 कुटुंबे राहत होती. दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शेजारच्या दोन इमारतीमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ही इमारत १०० ते १२५ वर्षे जुनी असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान कोसळेली इमारत सेस अंतर्गत येत असल्याची माहिती समोर आली आहे.
एक नजर टाकूया घटनाक्रमावर भेंडी बाजार परिसरातील मौलाना शौकत अली रोडवरील बोरी मोहल्ला येथे 5 मजली हुसैनी नावाची इमारत कोसळलीसकाळी 8.30 वाजता : हुसैनी इमारत कोसळल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षास प्राप्तसकाळी 8.31 वाजता : अग्निशमन दलानं दुर्घटनेची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला दिलीसकाळी 8.31 वाजता : अग्निशमन दलानं गाड्या घटनास्थळी रवाना केल्याची वेळसकाळी 8.38 वाजता : अग्निशमन दलाच्या 3 गाड्या, 2 फायर इंजिन व 1 अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचलेसकाली 8.38 वाजता : अग्निशमन दलाच्या सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार House Collapse Call Level 2 ची घर कोसळण्याची घटना असल्याचे घोषित करण्यात आलेसकाली 8.42 वाजता : अग्निशमन दलाच्या सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार House Collapse Call Level 3 ची घर कोसळण्याची घटना असल्याचे घोषित करण्यात आलेसकाली 8.45 वाजता : राष्ट्रईय आपत्ती प्रदिसादक पथकाला कार्यान्वित करण्यात आलेसकाली 9.45 वाजता : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे 90 जवानांचे पथक घटनास्थळी दाखल
हुसैनीवाला इमारत धोकादायक होती - पालकमंत्री सुभाष देसाई
दरम्यान, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सकाळी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. हुसैनीवाला ही इमारत धोकादायक होती. या प्रकरणाच्या चौकशीचे तात्काळ आदेश दिले जातील तर प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, असं सुभाष देसाई यांनी म्हंटलं आहे. दक्षिण मुंबईत बहुसंख्य इमारती धोकादायक आहेत, त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता तातडीने सोडविला जाईल, असंही सुभाष देसाई म्हणाले आहेत. दुर्घटना झालेली इमारत ही धोकादायक असल्याने काही लोकांनी आधीच घरं रिकामी केली होती. पण काही कुटुंब इमारतीत राहत होते. तेच लोक अपघातात सापडल्याचा दावा सुभाष देसाई यांनी केला आहे. भेंडीबाजार पाकमोडिया स्ट्रीट भागात असलेल्या हुसैनीवाला या इमारतीला 2013 मध्ये इमारत धोकादायक असल्याची नोटीस बजावण्यात आली होती. तरीही काही कुटुंब इमारतीत राहत होती, अशी माहिती समोर येते आहे. दुर्घटना ठिकाणी अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसंच स्थानिक लोकांकडूनही बचावकार्य केलं जातं आहे. एनडीआरएफचे ४५ जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. इमारतीचे एकुण तीन भाग असून त्यातील दोन इमारती कोसळल्या आहेत तर तिसरी इमारत ही आर्धी कोसळली असून इमारतीचा आर्धा भाग तसाच उभा असल्याची माहिती मिळते आहे.इमारतीच्या शेजारी असलेल्या बैठ्या चाळीवर या इमारती कोसळल्या आहेत.
गेल्या महिभरात मुंबई आणि उपनगरात इमारत कोसळल्याची तिसरी घटना आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी घाटकोपरमध्ये साई दर्शन इमारत कोसळली होती. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. तर दोन दिवसांपूर्वी विक्रोळीत इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता.