भिडे गुरुजींच्या भाषणावरही बंदी, मुंबईतील व्याख्यान पुढे ढकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 05:53 AM2018-01-06T05:53:13+5:302018-01-06T05:54:02+5:30
कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या भिडे गुरुजींचे मुंबईत रविवार, ७ जानेवारीला होणारे नियोजित व्याख्यान पुढे ढकलण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी वातावरण निवळल्यानंतर व्याख्यान घेणार असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या भिडे गुरुजींचे मुंबईत रविवार, ७ जानेवारीला होणारे नियोजित व्याख्यान पुढे ढकलण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी वातावरण निवळल्यानंतर व्याख्यान घेणार असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईचे विभाग प्रमुख बलवंत दळवी म्हणाले की, लालबाग येथील मेघवाडीत भिडे गुरुजींचे व्याख्यान होणार होते. पण पोलिसांनी विनंती केल्याने व्याखान पुढे ढकलण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. व्याख्यानाची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल. कोरेगाव भीमा प्रकरणात गुरुजींना गोवण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रकरणात बामसेफ, संभाजी ब्रिगेड या पुण्यातील एल्गार परिषदेच्या आयोजकांकडून कोरेगाव भीमा भागात हिंसाचार झाल्याची शक्यताही दळवी यांनी व्यक्त केली आहे.
या व्याख्यानाच्या आडून कोणताही घातपात होऊ नये, म्हणून केवळ व्याख्यान पुढे ढकलत आहोत. कोरेगाव भीमा प्रकरणातील खरा सूत्रधार भेटल्यावर पुन्हा सभेचे आयोजन केले जाईल, असा दावा संघटनेचे चेतन बारस्कर यांनी केला आहे.
भीम आर्मीचा विरोध कायम!
मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यामुळे मुंबईतील वातावरण गढूळ होण्याची शक्यता असल्याने त्यांना मुंबईत व्याख्यानास बंदी घालावी, अशी मागणी भीम आर्मी संघटनेने पोलीस आयुक्तांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनात केली आहे. भविष्यात भिडे गुरुजींचे व्याख्यान मुंबईत आयोजित केल्यास भीम आर्मी ते उधळून लावेल, असा इशारा संघटनेचे प्रदेश प्रमुख अशोक कांबळे यांनी दिला आहे.