Join us

ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहाला ‘भिक्कारकळा’

By admin | Published: May 20, 2015 10:50 PM

येथील शासकीय विश्रामगृहाला गेले अनेक महिने ‘भिक्कारकळा’ चढली आहे.

ठाणे : येथील शासकीय विश्रामगृहाला गेले अनेक महिने ‘भिक्कारकळा’ चढली आहे. व्ही.आय.पी. सुट वगळता नव्या व अन्य इमारतीतील खोल्यांमधील एसी बंद, गिझर नादुरुस्त, गाद्या सडक्या, बेड मोडके, बेडशीट, पिलोकव्हर, चादरी यांची महिनोनमहिने धुलाई नाही तसेच खोल्या आणि स्वच्छतागृहे यांच्या स्वच्छतेचा पत्ता नाही, अशी अवस्था सध्या आहे. त्यामुळे याला शासकीय विश्रामगृह म्हणावे की अनैतिक कृत्ये जिथे चालतात असा चादर बदलू लॉज म्हणावे. असा प्रश्न येथे राहणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना व अभ्यागतांना पडतो आहे. याबाबत येथील कर्मचारी सांगतात की येथे येणारे सुशिक्षित आणि उच्चपदस्थ एसीचा वापर काळजीपूर्वक करीत नाही. बाहेर जाताना तो बंद करीत नाहीत, त्यामुळे विजेचे बील भरमसाठ येऊ लागले. परिणामी प्रत्येक खोलीतील अभ्यागत बाहेर जाण्यापूर्वी त्याने एसी आणि दिवे, पंखे बंद केले की नाही हे पाहायचे कोणी? आणि ते सुरु असतील तर बंद करायचे कोणी? असा प्रश्न निर्माण झाला. तेवढे मनुष्यबळ नसल्याने रामबाण इलाज म्हणून नव्या इमारतीतील प्रत्येक खोलीतील एसीच बंद ठेवण्याचा निर्णय झाला. अनावश्यक वापराने बंद पडणाऱ्या एसीच्या दुरुस्तीचे बीलही प्रचंड येऊ लागले होते. ती डोकेदुखी संपविण्यासाठी एसी बंदच ठेवण्याचा इलाज केला गेला. तीच गोष्ट गिझरची त्याचाही अनावश्यक, निष्काळजी वापर होऊ लागल्याने त्यांच्याही नादुरुस्तीचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे एकदा गिझर बंद पडला की तो दुरुस्तच करायचा नाही, असा इलाज केला गेला. येथील कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या कहाण्यातर खूपच इरसाल होत्या. अनेकदा अधिकारी स्वत:च्या नावावर विश्रामगृह आरक्षित करतात. परंतु प्रत्यक्षात त्यात भलतेच राहतात. अनेकदा त्यांना येथील उपकरणे, यंत्रणा काळजीपूर्वक वापरण्याचे भान नसते. परिणामी एखाद्यावेळेस टाकी भरत असल्याने अथवा भरायची असल्याने नळाला पाणी आले नाही, तर ही मंडळी सगळे नळ उघडे ठेऊन बाहेर जातात. त्यामुळे भरलेली टाकी लगेच रिकामी होऊन जाते, पाणी वाया जाते. आणि जेव्हा ते परत येतात तेव्हा टाकी रिकामी झाल्याने पाणी अजूनही आले नाही. म्हणून तेच बोंब ठोकतात. दोन-चार जणांच्या या चुकीमुळे या संपूर्ण इमारतीतील अभ्यागतांना निर्जळी घडते. किंवा आंघोळीची गोळी घ्यावी लागते. (विशेष प्रतिनिधी)1येथील गाद्या या बहुतांशी कॉयर म्हणजे काथ्याच्या आहेत. त्या दर तीन ते चार वर्षांनी बदलणे अपेक्षित असते. कारण कापसाच्या गादीसारखी ही गादी रिकास्ट करता येत नाही. तसेच तिच्यात धूळ साठत राहते. अनेकदा तिच्यावर बसूनच खाणे, पिणे, जेवणे केल्यामुळे त्याचे डाग पडतात. 2 कॉयर दुय्यम दर्जाचा असेल तर तो कुजू लागतो. त्यामुळे गाद्यांना दुर्गंधी येते. गादीवर असलेले कव्हर बदलता येणे शक्य नसल्याने त्यालाही दुर्गंधी येते. तिच गोष्ट चादरी, बेडशीट आणि उशांच्या खोळांची. त्यांच्या धुलाईचे आणि ईस्त्रीचे बीलच दिले गेले नाही. तेव्हापासून त्यांची नियमीत धुलाई थांबली आहे.3हाऊसकिपींगसाठी आवश्यक तो निधी आणि कर्मचारी नाही. त्यामुळेही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे, असे येथील कर्मचारी सांगतात. मंत्री, आमदार, खासदार हे व्हीआयपी सूटमध्ये राहतात. त्यामुळे त्यांना या विश्रामगृहाच्या अन्य कक्षाची अवस्था कशी आहे? त्याची कल्पना येत नाही. त्यामुळे हा सावळागोंधळ सुरु आहे.एकनाथ शिंदे यात लक्ष घालतील का?४कल्याणच्या शासकीय विश्रामधामात सोलर वॉटर हिटर असून २४ तास मोफत गरमपाणी मिळते तेवढी कल्पकताही येथे दाखविली गेलेली नाही. ४दुर्दैव म्हणजे सार्वजनिक बांधकाममंत्री ठाण्याचे. तेच ठाण्याचे पालकमंत्री तरीही त्यांच्या खात्याच्या अंतर्गत असलेल्या ठाण्यातील विश्रामधामाची दुरावस्था आहे. ४छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी आपल्या नाशिक शहर व जिल्ह्यातील विश्रामगृहे एकदम टकाटक केली होती. त्याची आठवण अनेक ठाणेकरांना होते आहे.४एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंत्यांसह या संपूर्ण विश्रामगृहाचा दौरा करून पाहणी करावी व तातडीने त्यात सुधारणा घडवून आणावी अशी अपेक्षा सगळ्यांची आहे.