राज ठाकरेंच्या सभेला आम्हीही येणार; अटींचं उल्लंघन झाल्यास सभा बंद पाडणार, भीम आर्मीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 01:48 PM2022-04-29T13:48:20+5:302022-04-29T13:57:33+5:30
राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिल्यानंतर भीम आर्मी चांगलीच आक्रमक झाली आहे.
मुंबई- मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी एकूण १६ अटी घालत राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली आहे. यामध्ये जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करू नये, असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे.
पोलिसांनी घातलेल्या अटीमध्ये सदर सभा ०१/०५/२०२२ रोजी १६.३० ते २१.४५ या वेळेतच आयोजीत करावी. तसेच कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, असं सांगण्यात आलं आहे. तसेच सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये, असं म्हटलं आहे. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगु नये, अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये, अशी तंबीही पोलिसांनी दिली आहे.
राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिल्यानंतर भीम आर्मी चांगलीच आक्रमक झाली आहे. राज ठाकरेंनी सभेल पोलिसांनी दिलेल्या अटींचं उल्लंघन केलं, तर आम्ही सभा बंद पाडू, असा इशारा भीम आर्मीने दिला आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलीस प्रशासनाने १६ अटी घालून दिलेल्या आहेत. त्याच उल्लंघन ठाकरेंकडून सभेत झालं तर या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या घोषणा देऊन सभा बंद पाडू, असा इशारा भीम आर्मीने दिलाय. संपूर्ण महाराष्ट्रातून भीम आर्मीचे कार्यकर्ते हे राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला जाणार असल्याच भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्याविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे रोजीचा अल्टिमेटम दिला आणि तेव्हापासूनच राज्यात हिंदुत्व, हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांबाबत राजकारण सुरु झालं. ३ मेच्या अल्टिमेटमपूर्वी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
आम्हाला कोणतीही अट जाचक वाटत नाही- मनसे नेते बाळा नांदगावकर
पोलिसांनी अटी घातल्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका मांडली. सभेला परवानगी दिल्याबद्दल सरकार आणि पोलिसांचे आभार असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. पोलिसांनी घातलेल्या अटींचं पालन केलं जाईल, असं स्पष्ट केलं आहे. कायदा-सुव्यवस्था राखणं तुमच्याप्रमाणेच आमचं देखील कर्तव्य आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
बाळा नांदगावकर म्हणाले की, पोलिसांनी त्यांचं काम केलं आहे. आम्ही आमचं काम करणार. त्यापलीकडे काही झालं, तर पोलीस त्यांचं काम करण्यासाठी आहेतच. आम्हाला कोणतीही अट जाचक वाटत नाही. कारण पोलीस जेव्हा केव्हा सभा होतात, त्यासाठी अशाच प्रकारे अटी देतात. कदाचित आमच्या सभेसाठी जास्त अटी असतील. पोलिसांना सतर्क राहाणं गरजेचं असतं. त्या दिवशी प्रचंड कार्यक्रम आहेत. त्यामुळे पोलीस काळजी घेत असतील, असंही बाळा नांदगावकर यांनी यावेळी सांगितलं.