मुंबई - कोरेगाव-भीमाच्या विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचाराचे मुंबईत आज पडसाद उमटले. काही आंदोलकांनी चेंबूरमध्ये रेल रोको केल्याने हार्बर रेल्वे ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरु आहेत. आज सकाळी 11:45 वाजता काही आंदोलकांनी चेंबूर स्टेशनमध्ये घुसून घोषणाबाजी केली. त्यानंतर काही तरुणांनी रेल्वे रुळावर ठाण मांडून घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अप आणि डाऊन दिशेच्या लोकल ठप्प झाल्या. ऐन गर्दीच्या वेळी आंदोलकांनी आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केले. त्यामुळे अर्ध्या तासांनंतर हार्बर सेवा सुरळीत सुरू झाली.
एका तासानंतर हार्बर रेल्वेवरील गोवंडी येथे अडकलेल्या रेल्वे सुरू झाली असून. गोवंडी रेल्वे स्थानक ते चेंबूर स्थानकदरम्यान पोलिसांचा बंदोबस्त आहे. चेंबूरपाठोपाठ मुलुंडमध्ये रिक्षा रोको करण्यात आला. सायनमध्येही या घटनेचे पडसाद उमटल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी माहिती पडताळून घ्या - मुंबई पोलीस
भीमा कोरेगाव प्रकरणाचे राज्यभरात हिंसक पडसाद उमटले आहेत. मुलुंड, कुर्ला परिसरात बेस्ट बसची तोडफोड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. तसंच सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी माहितीची खात्री करुन घेतल्यानंतरच पोस्ट करावे, असेही सांगण्यात आले आहे.
सोशल मीडियावर अफवा पसरवणा-यांवर कारवाई करू - मुख्यमंत्री
भीम कोरेगाव प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी होणार आहे. या घटनेत ज्या युवकाचा मृत्यू झाला. त्याची हत्या समजून सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार आहे. याचबरोबर, मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यभरात ज्याठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या, त्याठिकाणी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच, अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवणाऱ्यांवर कारवाई करु, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जाणून घ्या काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?
पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं.सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला.
सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले.