Bhima Koregaon : शरद पवार यांची देखील नोंदवली जाणार साक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 07:53 PM2020-02-24T19:53:21+5:302020-02-24T19:57:36+5:30
Bhima Koregaon : शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
मुंबई - भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची देखील साक्ष नोंदवण्यात येणार आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी करत असलेल्या आयोगाचे अध्यक्ष न्या. जे. एन. पटेल यांनी ही माहिती दिली आहे. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबाबत देखील काही माहिती दिली होती.
भीमा- कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साक्ष देण्यासाठी बोलविण्यात येणार आहे. आयोगाचे अध्यक्ष न्या. जे. एन. पटेल यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी एसआयटीतर्फे कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सत्ता आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून चुकीच्या लोकांना यामध्ये गुंतविण्यात आलं असल्याचे पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते.
या पार्श्वभूमीवर वकील प्रदीप गावडे यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाकडे शरद पवार यांची साक्ष नोंदवून घेण्याची मागणी केली होती. पवारांकडे या प्रकरणी अधिक माहिती आहे का? याची खातरजमा करण्यासाठी त्यांना बोलवावे अशी मागणी वकील प्रदीप गावडे यांनी केली होती. ही मागणी मान्य करत आयोगाने आता शरद पवार यांना साक्षीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येईल. त्यांना साक्षीसाठी बोलवण्यात येईल, असे न्या. जे. एन. पटेल यांनी सांगितले.
काेरेगाव भीमाची दंगल घडविणारे नेमके कोण, याचा छडा लावणे हेच खरे आव्हान
कोरेगाव-भीमाचा तपास केंद्राकडे दिलेला नाही, यापुढेही देणार नाही- मुख्यमंत्री
भिमा कोरेगाव प्रकरणाचा तपास हा राज्य शासनाकडेच असावा - बाळासाहेब थोरात
केंद्र सरकारने एल्गार परिषद प्रकरणात तपास राज्य सरकारकडून काढून घेतल्यानंतर शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पवार यांनी भीमा कोरेगाव दंगलीत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा सहभाग असल्याचे म्हटले होते. तसेच भीमा कोरेगाव हिंसाचाराबद्दल बरीच विधानं केली होती. यावरून वकील प्रदीप गावडे यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार यांची साक्ष घेण्यात यावी कारण त्यांच्याकडे अधिक माहिती असावा, अशी मागणी आयोगाकडं केली होती.