लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना व श्रमिक कामगार संघटनेच्या राज्य सचिवपदी भीमेश मुतुला यांची निवड झाली आहे. त्यांनी मुंबई आणि परिसरातील अनेक रुग्णांना मदतीचा हात दिला आहे.
माणुसकी हरवत चाललेल्या युगात गोरगरीब रुग्णाला सर्वोतोपरी मदत करण्यासारखे दुसरे पुण्याचे काम नाही, एकीकडे कोरोना महामारीत अनेक रुग्ण मृत्यूच्या दारात उभे असताना त्यांना वाचविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहे. संपूर्ण राज्यात गेल्या पाच ते सहा वर्षांत या संघटनेने किमान दहा हजार रुग्णांना आर्थिकच नव्हे तर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंतची केलेली सर्व मदत म्हणजे एक मैलाचा दगड ठरेल, असे कार्य संघटनेच्या माध्यमातून अविरत सुरू आहे.
भीमेश मुतुला हे मुंबईच्या अंधेरी भागात राहून मुंबईतील पंचतारांकित रुग्णालयापासून तर शासकीय रुग्णालयात गरीब रुग्णांना मदतीचा हात देत आले आहेत. त्यांच्या कार्याची दखल बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी घेऊन त्यांना गौरविले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील हास्य अभिनेता जॉनी लिव्हर यांनी त्यांना आपल्या घरी बोलावून सन्मान करून त्यांच्या रुग्णसेवेला सलाम केला आहे.
सदैव रुग्णसेवेत रममाण असणार असा हा युवा कार्यकर्ता असून त्यांनी आपले संपूर्ण जीवन त्यांनी रुग्णसेवेला अर्पण केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भोटकर यांनी त्यांना बढती दिली आहे. मुंबई अध्यक्ष पदावरून महाराष्ट्र राज्य सचिव पदाची अधिकृत जबाबदारीही सोपवली आहे.
त्यांच्या अथक आणि निस्वार्थी परिश्रमाची ही पावती असून भविष्यातसुद्धा भीमेश मुतुला हे मुंबईसोबतच महाराष्ट्रातील असंख्य रुग्णांना मदतीचा हात देतील, असा आशावाद प्रदेशाध्यक्ष प्रवीण भोटकर यांनी व्यक्त केला, तर या निवडीने महाराष्ट्रातील सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
----------------------------------------------