Bhimjayanti: जयंतीचा जल्लोष... मध्यरात्री 131 किलोंचा केक कापून कॅबिनेटमंत्र्यांचं बाबासाहेबांना अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 07:49 AM2022-04-14T07:49:32+5:302022-04-14T07:50:44+5:30
डॉ. बाबासाहेबांची 131 जयंती आज साजरी होत आहे. त्यासाठी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध उपक्रमांनी यंदा जयंतीउत्सव साजरा होत आहे
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करुन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारनेही जंयतीनिमित्त 10 दिवस समता कार्यक्रमांचे आयोजन करत महामानवास अभिवादन केले आहे. मध्यरात्री देशभरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मुंबईतील भोईवाडा येथे तब्बल 131 किलोंचा केक कापून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेबांची 131 जयंती आज साजरी होत आहे. त्यासाठी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध उपक्रमांनी यंदा जयंतीउत्सव साजरा होत आहे. डॉ. बाबासाहेबांची पुस्तके भेट देऊन, त्यांच्यावरील व्याख्यानांचे आयोजन करुन, गरिब व दलित वस्तीत मदतीचा हात देऊन, शैक्षिणक उपक्रमांचं आयोजन करूनही ही जयंती साजरी करण्यात येत आहे. मुंबईतील भोईवाड परिसरात मध्यरात्री 12 वाजल्यानंतर तब्बल 131 किलोंचा केक कापून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी, कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक आणि भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
Maharashtra | A 131 kg cake was cut on the eve of the 131st birth anniversary of Dr. B.R. Ambedkar at Bhoiwada, Mumbai, in the presence of cabinet minister Varsha Eknath Gaikwad (13.04) pic.twitter.com/eMYObzcfW4
— ANI (@ANI) April 14, 2022
दरम्यान, देशभरात आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. कोविडच्या 2 वर्षांच्या निर्बंधनानंतर यंदा मिरवणूक काढून, एकत्र येत जल्लोषात ही जयंती साजरी होत आहे.
डॉ. आंबेडकर जयंतीचा इतिहास
14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली. जनार्दन सदाशिव रणपिसे हे आंबेडकरांच्या अत्यंत निष्ठावान अनुयायांपैकी एक होते. तेव्हापासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. भारतात 14 एप्रिल ही दरवर्षी अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते.