शेखर साळवेमुंबई : हुतात्मा स्मारकावर कायम तेवत असलेल्या ज्योतीच्या धर्तीवरच चैत्यभूमीवरही कायमस्वरूपी ‘भीमज्योत’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रज्वलित होणार आहे. याबाबतचा आराखडा तयार झाला असून, लवकरच काम चालू होणार आहे. वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी पुढाकार घेत हा प्रस्ताव मांडला होता.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेल्या चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत तेवत ठेवावी, अशी मागणी एप्रिल २०१६ मधील विधानसभेत नगरविकास विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चेत सहभागी होताना आमदार कोळंबकर यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर अनेक दिवस हा प्रस्ताव रखडला होता. मात्र, या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत ही भीमज्योत प्रज्वलित करण्याचा निर्धार करून त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटून त्याबाबत चर्चा केली. त्यानंतर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसोबत दोन बैठका घेतल्या.
दरम्यान, वास्तुविशारद शशी प्रभू आणि महानगर गॅस यांच्या संयुक्त विद्यमाने आराखडा तयार करण्यात आला असून, हा आराखडा मंजुरीसाठी मेरीटाइम बोर्ड, पर्यावरण खाते, मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडे पाठविण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर लगेच काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कोळंबकर यांनी दिली आहे.