एमआयडीसीकडून भार्इंदरला अतिरिक्त २५ दशलक्ष लिटर पाणी
By admin | Published: December 4, 2014 11:58 PM2014-12-04T23:58:36+5:302014-12-04T23:58:36+5:30
गरज असलेल्या एकूण १२५ एमएलडी पाण्यापैकी सध्या ५० एमएलडी पाणी शहराला मिळत असून उर्वरीत ७५ एमएलडी पाणी शहराला तांत्रिक प्रक्रीया पार पडल्यानंतर प्राप्त होणार आहे.
राजू काळे, भार्इंदर
वाढत्या लोकसंख्येच्या मीरा-भार्इंदर शहरातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आल्याने एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी पालिकेला २५ एमएलडी अर्थात दशलक्ष लिटर अतिरीक्त पाणी नुकतेच मंजूर केले आहे. गरज असलेल्या एकूण १२५ एमएलडी पाण्यापैकी सध्या ५० एमएलडी पाणी शहराला मिळत असून उर्वरीत ७५ एमएलडी पाणी शहराला तांत्रिक प्रक्रीया पार पडल्यानंतर प्राप्त होणार आहे.
शहराची लोकसंख्या ८ लाख १४ हजार ६५५ इतकी अधिकृतपणे असली तरी ती सुमारे १३ लाखांच्या आसपास गेली आहे. या लोकसंख्येला सध्या होणारा पाणीपुरवठा १३६ एमएलडी इतका असून तीन महिन्यांपूर्वी तो ११६ दशलक्ष इतका होता. त्यात एमआयडीसीकडून २० एमएलडी पाण्याची भर पडल्याने शहराचा घसा ओला होण्यास काहीसी मदत मिळाली आहे. त्यात एमआयडीसीकडून ५० व स्टेम कंपनीकडून ८६ एमएलडी पाण्याचा समावेश आहे. परंतु, प्रती माणशी १५० लीटर्स पाणी दररोज आवश्यक असताना ते सुमारे १०० लीटर्स पर्यंतच मिळत आहे. यामुळे सध्याचा पाणीपुरवठासुद्धा वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात अपुराच असल्याने शहराला आणखी पाण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने सांगितले़