ठाणे : वाहन चालवण्याच्या बनावट परवान्यांची धडाक्यात विक्री करणाºया मुलुंड येथील मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या मालकाकडून हस्तगत केलेल्या परवान्यांची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. आरोपीजवळ आढळलेल्या बहुतांश परवान्यांवर भिवंडी येथील एकच पत्ता नमूद असल्याचे या पडताळणीमध्ये उघडकीस आले आहे.वाहन चालवण्याच्या बनावट परवान्यांची विक्री करणाºया मुलुंड येथील चौधरी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा मालक सुनील चौधरी याला गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ च्या अधिकाºयांनी १५ जानेवारी रोजी अटक केली होती. पोलिसांनी त्याच्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलची झडती घेऊन २५३ बनावट परवान्यांसह सरकारी कार्यालयांचे बनावट शिक्के आणि इतर सामग्री हस्तगत केली होती. त्यापैकी ४९ परवान्यांवर चालकाचा पत्ता म्हणून भिवंडीजवळील अनगाव येथील शासकीय रुग्णालयानजीकच्या चाळीचा उल्लेख केला आहे.या परवान्यांवर चालकाचा पत्ता म्हणून एकाच चाळीचा उल्लेख करताना आरोपीने केवळ रूम नंबर बदलला आहे. याशिवाय, २९ परवान्यांवर चालकाचा पत्ता म्हणून ठाण्यातील मुकुंद कंपनीजवळच्या शिवाजीनगर चाळीचा उल्लेख करण्यात आला आहे.आरोपीजवळून हस्तगत करण्यात आलेल्या बोगस परवान्यांचा तपशील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोपीने आतापर्यंत जवळपास ७०० चालकांना बोगस परवाने विकले आहेत. विकण्यात आलेल्या या परवान्यांमध्ये बहुतांशी रिक्षाचालकांचा समावेश आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि वाहतूक शाखेच्या मदतीने त्यांचे परवाने जप्त करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बहुतांश बोगस ड्रायव्हिंग लायसन्सवर भिवंडीचा पत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 4:56 AM