भिवंडी मनपाची घंटागाडी कागदावरच

By admin | Published: July 4, 2014 03:52 AM2014-07-04T03:52:11+5:302014-07-04T03:52:11+5:30

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत शहरात दररोज ४० घंटागाड्या फिरत आहेत.

Bhiwandi Municipal Garbage Paper on | भिवंडी मनपाची घंटागाडी कागदावरच

भिवंडी मनपाची घंटागाडी कागदावरच

Next

भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत शहरात दररोज ४० घंटागाड्या फिरत आहेत. त्यांच्यावर घंटा न लावल्याने त्यांचा आवाज स्थानिक रहिवाशांपर्यंत पोहोचत नाही. मात्र, मनपाच्या कागदपत्रांवर दररोज शहरात घंटागाड्यांची नोंद होते आणि चक्क बिलेही काढली जात असल्याने नागरिकांकडून याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
महानगरपालिकेने अकार्यक्षम ठेकेदारांची हकालपट्टी केल्याने गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे तीनतेरा वाजले होते. शहरात कचरा नियमित उचलला जात नव्हता. दरम्यान, स्वच्छता विभागामार्फत खाजगी वाहनांमार्फत शहरातील कचरा उचलण्याचे काम उपायुक्त विजया कंठे यांच्यामार्फत सुरू केले. त्यानुसार, शहरातील कचरा उचलण्यासाठी दररोज ११ जेसीबी, ३२ डम्पर, ४० घंटागाड्या व २ ट्रॅक्टर तसेच त्यावरील माणसे मिळून दररोज ३ लाख ६ हजार ४९१ रुपये रोखीने खर्च केले जात आहेत. वास्तविक, लहान वाहनांद्वारे शहरातील गल्लीबोळांतील कचरा जमा करावा तसेच त्या वाहनांवर घंटा लावून परिसरातील नागरिकांकडून कचरा दररोज जमा करावा, हे घंटागाडीचे काम असताना शहरात फिरणाऱ्या घंटागाड्यांवर घंटाच लावल्या नाहीत. तसेच त्या गल्लीबोळांतून कचराही जमा करताना दिसत नाहीत. मात्र, आरोग्य विभागातील कागदपत्रांवर घंटागाड्यांनी दररोज बिल घेतल्याची नोंद होत आहे. पूर्वी अशाच घंटागाड्यांनी भिवंडी कचरा कुंडीमुक्त झालेली होती. त्यामुळे शहरातील रोगराई कमी झाली होती. मात्र, काही नगरसेवक आणि प्रशासन याबाबत गंभीरपणे विचार करीत नसल्याने शहरात घाणीबरोबर रोगराईचे साम्राज्य दिसून येते. त्यासाठी मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांनी ‘कचराकुंडीमुक्त भिवंडी’ हा उपक्रम राबवून भिवंडीकरांची रोगराईपासून मुक्तता करावी, अशी मागणी स्थानिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bhiwandi Municipal Garbage Paper on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.