Join us  

भिवंडी: चिराडपाडा येथे वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू, एक गंभीर

By नितीन पंडित | Published: October 14, 2022 9:58 PM

परतीच्या पावसाने घातला महाराष्ट्रात धुमाकूळ

लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असताना भिवंडी तालुक्यात पिसे ग्रामपंचायत हद्दीतील चिराडपाडा या आदिवासी वस्ती असलेल्या ठिकाणी वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघा युवतींचा जागेवरच दुर्दैवी मृत्यु झाला तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. शीतल अंकुश वाघे वय १७, योगिता दिनेश वाघे वय २० अशी मयत युवतींची नावे आहेत तर गंभीर जखमी सुगंधा अंकुश वाघे वय ४० यांना पडघा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रथमोपचार करून भिवंडी येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

चिराडपाडा या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या शीतल अंकुश वाघे,योगिता दिनेश वाघे व सुगंधा अंकुश वाघे या सायंकाळी पाऊस नसल्याने जंगलात खेकडे पकडण्यासाठी गेले असता अचानक आकाश ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट करीत पावसाला सुरवात झाली .त्यामध्ये अचानक कडाडलेली वीज कोसळली ती या महिला उभ्या असलेल्या ठिकाणी,त्यामध्ये या तिघी ही गंभीर जखमी होऊन पडल्या.सुमारे एक तासाने ही माहिती पाड्यावर कळल्या नंतर ग्रामस्थांनी या तिघींना पडघा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी घेऊन गेले तेथे दोघी जणींना वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले तर एका जखमी महिलेला पुढील उपचारासाठी भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

गंभीर जखमी महिला उपचाराला प्रतिसाद देत आहे.घटनेची माहिती कळताच श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा येथे धावून आले व त्यांनी गंभीर जखमी महिलेस तात्काळ भिवंडी येथे उपचारासाठी घेवुन जाण्याची व्यवस्था केली. घडलेली दुर्घटना दुर्दैवी असून त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्याची गरज असून शासनाने नैसर्गिक आपत्तीत जीव गमावलेल्या युवतींच्या कुटुंबियांना तात्काळ मदत घ्यावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केली आहे. तहसीलदार अधिक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी व तलाठी यांना घटनास्थळी रवाना केले असून शासना कडून योग्य ती मदत तात्काळ देण्याबाबत कार्यवाही केली जाईल अशी माहिती दिली आहे.

टॅग्स :भिवंडीपाऊसमृत्यूमुंबई