Join us

भोजपुरी अभिनेता मनोज पांडे बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 11:26 AM

भोजपुरी अभिनेता मनोज पांडेला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे भोजपुरी अभिनेता मनोज पांडेला बलात्काराच्या आरोपाखाली अटक.अभिनेता मनोज पांडेने लग्नाचं तसंच सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून गेल्या पाच वर्षांपासून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप.एका भोजपुरी गायिकेने केला आरोप.

मुंबई, दि. 22- भोजपुरी अभिनेता मनोज पांडेला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अभिनेता मनोज पांडेने लग्नाचं तसंच सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून गेल्या पाच वर्षांपासून वारंवार माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका भोजपुरी गायिकेने केला होता. या प्रकरणी या गायिकेने चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती.  तिच्या तक्रारीवरूनच चारकोप पोलिसांनी मनोज पांडेला अटक केली आहे.

पीडित भोजपुरी गायिका 2012 पासून म्हणजेच गेली पाच वर्षे ही मनोज पांडेबरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहात होती. याचदरम्यान एकदा जबरदस्ती तिला गर्भपात करण्यासाठी त्याने भाग पाडलं होतं, असा आरोप पीडित गायिकेने तक्रारीत केला आहे. मनोजने लग्नाचं आमिष दाखवून माझी फसवणूक केली. माझ्याऐवजी त्याने वर्षा नावाच्या दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं आहे, असा आरोपही या गायिकेने केलेला आहे. १५ सप्टेंबर रोजी तिने मनोजविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीस मनोजचा शोध घेत होते. मनोजने त्याचा मोबाइल बंद ठेवल्याने पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. पण आज अखेरीस त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. या पीडित महिलेला एका दुसऱ्याचं महिलेने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. मनोजपासून दूर रहा, नाहीतर परिणाम वाईट होतील, अशी धमकी या पीडित तरूणीला देण्यात आली होती. या धमकीच्या फोननंतरच तिने 15 सप्टेंबर रोजी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

मनोज आणि पीडिता दोघेही उत्तर प्रदेशमधील राहणारे आहेत. पीडित तरुणी भोजपुरी गायिका असून तिने अल्बममध्येही काम केलेलं आहे. तर मनोज पांडेने 'सौगंध गंगा मईया के', 'कईसन पियवा के चरितर बा', 'लहरिया लूट ए राजा जी', आणि 'लाल चुनरिया वाली' अशा अनेक भोजपुरी सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याने काही हिंदी सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. भोजपुरी सिनेसृष्टीत मनोजच्या कुटुंबाचा दबदबा असल्याचं बोललं जातं आहे. तसंच मनोजचा भाऊ प्रसिद्ध दिग्दर्शक असल्याचीही माहिती मिळते आहे.