मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत भोजपुरी सिनेअभिनेते सुदीप पांडे आणि दीपा पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आगामी बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मूळ बिहारचा असलेल्या या अभिनेत्याने राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हाती बांधलं आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीला बिहार निवडणुकांसाठी बळ मिळाल्याचं दिसून येत.
बिहारमध्ये काँग्रेस आणि राजदसोबत एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल, वरिष्ठ नेते अहमद पटेल, तसेच राजदचे तेजस्वी यादव यांच्याशी आपण याबाबत चर्चा केली होती. आम्ही जास्त जागांसाठी आग्रहीदेखील नव्हतो पण एकत्र लढण्याची काँग्रेसची मानसिकता दिसली नाही. त्यामुळे आता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे असे प्रफुल पटेल यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादीकडून बिहार निवडणुकांसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, प्रमुख स्टार प्रचारक म्हणून शरद पवार यांच्यावर जबाबदारी आहे.
बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुदीप पांडे आणि दीपा पांडे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे, त्यांना बिहार विधानसभेत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, मुंबईतील पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.