भोलेबाबा की गोली... १० ते १५ रुपयांत
By मनीषा म्हात्रे | Published: March 5, 2023 07:52 AM2023-03-05T07:52:19+5:302023-03-05T07:54:39+5:30
होळी म्हटलं की, अनेकांमध्ये भांग सेवनाची विशेष ओढ दिसून येते. हिंदी सिनेमात होळीगीतांमध्येही भांगेला स्थान देण्यात आले आहे.
होळी म्हटलं की, अनेकांमध्ये भांग सेवनाची विशेष ओढ दिसून येते. हिंदी सिनेमात होळीगीतांमध्येही भांगेला स्थान देण्यात आले आहे. भांग विकण्यास कायदेशीर बंदी असली तरी दरवर्षी धुळवडीला भांगेची सर्रास विक्री होते. लहान वस्त्यांपासून पंचतारांकित गृहसंकुलांपर्यंत सर्वत्र भांगेची मागणी वाढत आहे. भांगेचा थांग कुणालाही लागू नये, यासाठी ‘भोले बाबा की गोली’, ‘हरी गोली’, ‘गोला’, अशा वेगवेगळ्या टोपणनावांनी भांगेची छुपी विक्री सुरू आहे. मात्र, भांगेचे अतिसेवन केल्यास ती जीवघेणी ठरू शकते.
धुळवडीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात भांगेचे सेवन करण्याची प्रथा रूढ आहे. सेलिब्रिटींमध्येही याची वेगळीच क्रेझ पाहावयास मिळते. कोरोनामुळे दोन वर्षे या सणाला ब्रेक लागला. मात्र, गेल्या वर्षापासून पुन्हा भांगविक्रेते चोरपावलांनी आले आहेत. मुख्यत्वे उपनगरांतील हिंदीबहुल भागांमधून भांगेचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती मिळते आहे.
भांगेच्या गोळ्या
पाकीटबंद भांगेच्या गोळ्यांची विक्री केली जाते. साधारण ५ इंच आकाराची हिरवी गोळी १५ ते २० रुपयांपर्यंत विकली जाते. पानटपऱ्यांवरही या गोळ्यांची छुपी विक्री सुरू असते. यात दरवर्षी लाखोंची उलाढाल होत असते.
ऑनलाइनही उपलब्ध ! : उत्तर प्रदेशातून काही टोळ्या भांगेच्या गोळ्यांची पाकिटे घेऊन मुंबईत दाखल होतात. मुंबई पोलिस त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचेही एका अधिकाऱ्याने नमूद केले. ऑनलाइनही याची विक्री होते. दुसरीकडे गांजाचीही मागणी या काळात वाढते.
...म्हणून कारवाईचे प्रमाण कमी
भांग ही अमली पदार्थविरोधी कायद्याअंतर्गत येत नसल्याने मुंबईत कारवाईचे प्रमाण कमी आहे. मादक पदार्थांअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून यावर कारवाई होते.
यावर्षी पहिल्या महिन्यातच अमली पदार्थविरोधी विभागाने ७६ किलो गांजा जप्त केला.
भांगेची कुल्फी काही भागांत लोकप्रिय आहे. भांगेची गोळी पानटपऱ्यांवर विकली जाते.
गांजा आणि भांग : गांजा आणि भांग केनेबीस नावाच्या झाडापासून बनवतात. ते एका प्रजातीच्या नर आणि मादी वनस्पतीपासून तयार होतात. नर प्रजातीपासून भांग बनवली जाते तर मादी प्रजातीपासून गांजा बनवला जातो. गांजा फुलापासून बनवला जातो. गांजाचे सेवन हे जाळून त्याचा धूर घेऊन केले जाते. अनेक लोक खाण्यात किंवा पिण्यातदेखील करतात. गांजा आंध्र प्रदेश तसेच नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मुंबईत येतो.
कुठे विक्री होते ?
पानटपरीवर भांगेच्या गोळ्यांच्या विक्रीची माहिती मिळताच कारवाई होते. मात्र, कुणी वैयक्तिक पातळीवर विक्री करत असल्यास त्यांचा माग काढणे कठीण जाते, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
अलीकडे पानटपऱ्यांवरही उघडपणे भांग विकली जात नाही. भांगेच्या गोळ्यांऐवजी ‘भोले बाबा की गोली’, ‘हरी गोली’ अशा विविध टोपणनावांनी भांगविक्री केली जात असल्याची माहिती मुंबईतील येथील एका पानविक्रेत्याने दिली. अनेक ठिकाणी रसायनमिश्रित भांग विकली जात असल्यामुळे ती जास्त घातक ठरत आहे.