नागपाड़ा पोलिसांची कारवाई
वृद्धेला गंडा घालणाऱ्या भोंदूबाबांना अटक
नागपाडा पोलिसांची कारवाई : पैशांचा पाऊस पाडण्याचे दाखवले आमिष
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पैशांचा पाऊस पाडताे, असे आमिष दाखवून ८२ वर्षीय वृद्धेला ३९ लाखांना गंडा घालणाऱ्या दुकलीला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. हनीफ मोहम्मद शेख (३०) आणि इम्रान मोहम्मद सय्यद (२८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, ते मालवणी परिसरात राहणारे आहेत.
नागपाडा परिसरात ८२ वर्षीय वृृद्ध महिला राहते. सन २०१९मध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान या भोंदूबाबांसोबत तिची ओळख झाली. त्यांनी वृद्धेला पैशांचा पाऊस पाडून देताे, असे सांगितले. वृद्धेनेही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना घरी बोलावले. तेव्हा या भाेंदूबाबांनी घरात अंधार करुन खोट्या पैशांचा पाऊस पाडला. त्या नोटा कपाटात ठेव आणि कुणाला याबाबत माहिती देऊ नकाेस, एवढ्यात हे पैसे वापरू नकाेस अन्यथा तुझे खूप नुकसान होईल, तुझ्या मुलींच्या आयुष्यातही विघ्न निर्माण होतील, अशी भीती घातली.
पुढे वेगवगेळ्या पूजापाठांसाठी तिच्याकडून ३९ लाख रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या वृद्धेने पैसे देणे बंद केले. तेव्हा या भाेंदूबाबांनी तिच्या मुलीकडे पैशांची मागणी केली. अखेर त्यांनी नागपाडा पाेलिसात धाव घेतली. पोलिसांनी तपासाअंती दुकलीला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
.......................