डॉक्टरांवर हल्ला केल्यास वाजणार भोंगा, रुग्णालयात खास उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 05:38 AM2023-07-21T05:38:00+5:302023-07-21T05:38:18+5:30
हल्ले रोखण्यासाठी आता रुग्णालयात खास उपाययोजना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांवरील हल्ले ही नित्याची बाब झाली आहे. नायर रुग्णालयात मंगळवारी मध्यरात्री असाच एक प्रकार घडला. एका रुग्णाचा रुग्णालयात मृत्यू झाला. यावरून नातेवाईक आणि मेडिसीन विभागातील निवासी डॉक्टरांची शाब्दिक बाचाबाची झाली. यावरून नातेवाइकांनी डॉक्टरला धक्काबुक्की केली. त्यावरून रुग्णालय प्रशासनाने आता रुग्णालयातील सर्व संवेदनशील ठिकाणी भोंगे लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे असा काही अनुचित प्रकार घडला आणि भोंग्याचे बटन दाबले की, तत्काळ डॉक्टरांच्या मदतीसाठी सुरक्षारक्षक पोहोचू शकतील.
या घटनेनंतर नायर रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने तत्काळ अनुचित प्रकार घडल्यासंदर्भात रुग्णालयाच्या अधिष्ठातांना पत्र दिले. कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना सुरक्षा द्यावी, ही मागणी केली होती. या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल करावी, असेही सुचविले होते. या प्रकरणाची गंभीर दखल रुग्णालय प्रशासनाने घेतली असून, लवकरच ते डॉक्टरच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणार आहेत.
निवासी डॉक्टरांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. जो प्रकार घडला तो योग्य नाही. त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची माहिती आग्रीपाडा पोलिसांना दिली आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आम्ही रुग्णालय परिसरात भोंग्याची व्यवस्था करू. तो भोंगा वाजल्याची माहिती फक्त सुरक्षारक्षकांना कळेल, अशी व्यवस्था करून घेणार आहोत.
- डॉ. सुधीर मेढेकर,
अधिष्ठाता, नायर रुग्णालय
`जेजे`मध्ये वाजतोय भोंगा
निवासी डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटनांत वाढ झाल्यानंतर जे.जे. रुग्णालय प्रशासनाने अशा वाद उद्भवणाऱ्या जागा निश्चित केल्या. तेथे भोंग्याचे बटन लावले. सगळ्याचे नियंत्रण सुरक्षारक्षक ज्या ठिकाणी तैनात असतात त्यांना दिले. बटन दाबल्यानंतर पाच मिनिटांच्या आत पाच ते सहा सुरक्षारक्षक तेथे दाखल होतील, अशी व्यवस्था केली आहे. भोंग्याचे बटन दाबायची माहिती केवळ सुरक्षारक्षकांनाच आहे. ही यंत्रणा चालू आहे की नाही याची दर पंधरा दिवसांनी चाचपणी केली जाते. त्याची जबाबदारी वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आहे.