'अवेस्ता पहलवी' अभ्यास केंद्राच्या इमारतीचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन
By रेश्मा शिवडेकर | Published: March 4, 2024 09:39 PM2024-03-04T21:39:50+5:302024-03-04T21:40:14+5:30
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात भूमीपूजन
रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्राचीन, समृद्ध आणि वैभवशाली पारसी- झोराष्ट्रीयन संस्कृतीच्या अध्ययन व संशोधनासाठी या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठात अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्राची स्थापना केली जाणार आहे. या अभ्यास केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन मंगळवार, ५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता केंद्रीय महिला व बाल विकास आणि अल्पसंख्यांक कार्य मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात होणार आहे.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उदवाडाचे प्रधान पुजारी वडा दस्तूरजी खुर्शेद दस्तूर, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नादिर बुर्जोरजी गोदरेज, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव जितेंद्र सिंह राजे यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
स्कूल ऑफ लँग्वेजेसच्या माध्यमातून अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्र कार्यान्वित होणार आहे. या अनुषंगाने नवी दिल्लीत मुंबई विद्यापीठ आणि अल्पसंख्याक कार्य मंत्रालय यांच्यात नुकताच सामंजस्य करारही करण्यात आला आहे. तसेच अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्राच्या स्थापनेसाठी केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाकडून जवळपास १२ कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ लाभले आहे.
या अभ्यास केंद्राच्या माध्यमातून अवेस्ता पहलवीच्या समृद्ध वारस्याचे जतन आणि संवर्धन, झोरास्ट्रीयन संस्कृती, भारताच्या विकासात पारसी समुदायाचे योगदान, भाषिक वैशिष्ट्यांचे दस्तऐवजीकरण आणि अवेस्ता पहलवीचे भारतीय सांस्कृतिक विविधतेतील योगदान अशा अनुषंगिक विषयांचे सखोल अध्ययन या केंद्राच्या माध्यमातून केले जाणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने भारतीय भाषांचे जतन, संवर्धन, प्रचार आणि प्रसार यास अनुसरून मुंबई विद्यापीठात संस्कृत, पाली, पर्शियन भाषांच्या अनुषंगानेच अवेस्ता पहलवी भाषा आणि संस्कृतीवर अभ्यास केला जाणार आहे. वैश्विक स्तरावर भारतीय संस्कृतीचा प्रचार, पारसी संस्कृती आणि भारतीय सांस्कृतिक परंपरा आणि आंतरराष्ट्रीय सहयोगाला प्रोत्साहन देण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून मुंबई विद्यापीठात या केंद्राची स्थापना केली जात आहे.