- मनोहर कुंभेजकरमुंबई - गेल्या २० वर्षांपासून रखडलेला मुंबई महानगर पालिकेचा यारी रोड ते एसव्हीपी नगर दरम्यानचा पूल लवकरच सेवेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अंधेरी यारी रोड ते एसव्हीपी नगर या पूलावरून ४५ मिनिटांचा प्रवास फक्त पाच मिनिटांत करणे शक्य होणार आहे.
यारी रोड ते एसव्हीपी नगर हा मुंबई महानगर पालिकेचा महत्वाकांक्षी 110 मीटरचा पूल गेली 20 वर्षे प्रलंबित आहे.परिणामी येथील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.तसेच येथील नागरिकांना किमान वळसा घालून किमान ४५ मिनिटांचा त्यांचा वेळ जातो आणि इंधनाचा अपव्यय होतो.त्यामुळे सदर पूल लवकर बांधवा अशी येथील नागरिकांची मागणी होती.
काल सायंकाळी वर्सोवा विधानसभेच्या आमदार डॉ.भारती लव्हेकर आणि अनेक सिने अभिनेत्यांच्या उपस्थितीत यारी रोड ते एसव्हीपी नगर पूलाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी अभिनेता गुलशन ग्रोव्हर, अभिनेता वरुण शर्मा, अभिनेता -निर्माता शशी रंजन,अभिनेता वरुण शर्मा, अभिनेता आदित्य सील, अभिनेता अनुष्का रंजन, प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ अफरोज शाह, अभिनेता-गायक शैलेंद्र सिंग,अभिनेता तेज सपृ,भाजप नेते तरुण राठी माजी नगरसेवक योगिराज दाभाडकर,माजी नगरसेविका रंजना पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पूलाचा भूमीपूजन सोहळा यारी रोड येथे पार पडला.या मान्यवरांनी यावेळी आमदार डॉ.भारती लव्हेकर यांच्या कार्याचा गौरव केला.
आमदार डॉ.भारती लव्हेकर म्हणाल्या की, दि,२६ ऑगस्ट २०१५ साली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूलाला मान्यता दिली होती.मात्र अजूनही हा पूल झालेला नसल्याने सदर पूल लवकर बांधून येथील वाहतूक कोंडी दूर करावी अशी मागणी सातत्याने विधानसभेत केली होती.या पूलासाठी वन खात्याची परवानगी मिळायला वेळ लागला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंग चहल यांनी या पूलासाठी मोलाचे सहकार्य केले.या दोन या पूलांमुळे सध्या होणारी वाहतूककोंडी फुटण्यास मदत होणार असून वेळ, इंधन वाचणार आहे. हा पूल प्रवाशांसाठी जीवनवाहिनी असून गर्दी कमी करणारा आणि कनेक्टिव्हिटी वाढवणारा आहे अशी माहिती त्यांनी दिली.
यारी रोड बचाव समितीचे अध्यक्ष शशी रंजन म्हणाले की,यारी रोड ते एसव्हीपी नगर दरम्यानच्या पूलाचे भूमीपूजन हा केवळ मैलाचा दगड नाही; हे सामुदायिक सक्रियता आणि चिकाटीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. वर्षानुवर्षे आमदार डॉ.भारती लव्हेकर आणि आम्ही आमच्या क्षेत्राच्या भल्यासाठी संघर्ष केला आणि आज आम्हाला आमच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ मिळाले आहे. या प्रकल्पाची न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे हा पूल रखडला होता.या संदर्भात येथील राहिवाश्यांनी केलेली याचिका प्रथम मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आणि मग रहिवासी सर्वोच्च न्यायालयात गेले असता त्यांची याचिका फेटाळतांना त्यांना दोन लाखांचा दंड केला होता अशी माहिती त्यांनी दिली.