मुंबई : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मुंबईसत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दिलासा दिला आहे. न्यायाधीश आर एन रोकडे यांनी खडसे यांचा नियमित जामीन मंजूर केला आहे. २ लाख रूपयाच्या जात मुचलक्यावर खडसे यांची न्यायालयाने सुटका केली असून ईडीच्या प्रकरणात अटक न होता जामिनावर सुटका झालेले ते महाराष्ट्रातील एकमेव माजी मंत्री आहेत.
पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड कमी किंमतीत खरेदी केल्याच्या आरोपावरून खडसे यांना ईडीने समन्स बजावले होते तसेच त्यांच्याविरुद्ध इसीआयआर दाखल केला. एवढेच काय तर ईडीने एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी तसेच जावई गिरीश चौधरी व अन्य काही जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी आपल्याला नियमित जामीन मिळावा यासाठी एकनाथ खडसे यांनी सत्र न्यायालयात ऍड मोहन टेकावडे यांच्या मार्फत अर्ज केला त्या अर्जावर न्यायाधीश आर एन रोकडे यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड टेकवडे यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, खडसे यांच्यावर पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आला असला तरी पीएमएलएच्या कलम ३ आणि ४ नुसार केस दाखल होऊ शकत नाही.
तसेच एसीआर मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की जमीन संपादनाची कार्यवाही पूर्ण झालेली नाही व जागा खरेदीसाठी खडसे यांची पत्नी आणि जावई यांच्यात कोणताही कट रचण्यात आलेला नाही, अर्जदारावर करण्यात आलेले आरोप खोटे असून यात त्यांचा कोणताही दोष नाही तसेच त्यांनी आपल्या पदाचा कोणताही गैरवापर केलेला नाही ईडीच्या वतीने मात्र हा युक्तिवाद फेटाळून लावण्यात आला व जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत २ लाखाच्या जात मुचलक्यावर खडसे यांचा जामीन मंजूर केला.