सकृतदर्शनी एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरफायदा घेतला : न्यायालयाने नोंदविले निरीक्षण
भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण :
सकृतदर्शनी एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरफायदा घेतला : न्यायालयाने नोंदविले निरीक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे प्रथमदर्शनी पुरेसे पुरावे असल्याचे मत विशेष न्यायालयाने खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळताना व्यक्त केले. खडसे यांनी पदाचा गैरफायदा घेतला. वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागांना आपल्या प्रभावाखाली आणले, असे महत्त्वाचे निरीक्षणही यावेळी विशेष न्यायालयाने म्हटले. तसेच खडसे आता सत्ताधारी पक्षात असले तरी कथित घोटाळा झाला तेव्हा ते भाजपमध्ये होते, याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले.
गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयाने खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. हा जामीन नाकारण्यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशात वरील निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.
गेल्याच आठवड्यात ईडीने एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व गिरीश चौधरी यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले आहे.
पुण्यातील भोसरी येथील भूखंड खरेदी करताना खडसे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना फायदा मिळवून देण्यासाठी त्यांच्या पदाचा गैरफायदा घेतल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. जेव्हा संबंधित भूखंड कायद्याच्या कचाट्यात सापडल्याचे दाखवण्यात आले, त्यावेळी खडसे यांच्या कुटुंबीयांना फायदा मिळण्यासाठी करार करण्यात आला, असेही न्यायालयाने म्हटले.
रिट याचिका प्रलंबित असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत अर्जदार (गिरीश चौधरी आणि खडसे यांच्या पत्नीने संबंधित जमिनीसंबंधी करार केला. यावरून अर्जदार (चौधरी) वैयक्तिक फायद्यासाठी काहीही करू शकतात आणि खटल्यावर प्रभाव पाडू शकतो, हे सिद्ध होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
परिणामी, या सर्व पुराव्यांसह आणि मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यातील सहभागासह मी असे स्पष्ट करतो की, हा गुन्हा पदाचा गैरवापर आणि अधिकारांचा गैरफायदा करून केलेला आहे. जर अशा गुन्ह्यात जामीन मंजूर केला तर कायद्याचे पालन करणाऱ्या समाजाला चुकीचा संदेश जाईल, असे न्यायालयाने म्हटले.