मुंबई : पुणेस्थित शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या अध्यक्षाशी असलेल्या संबंधांचा वापर करत आणि स्थानिक व्यापारी व शेतकऱ्यांच्या मालमत्ता गहाण टाकत अवैधरीत्या कर्जाची उचल केल्याप्रकरणी ईडीने मंगलदास बांदल, हनुमंत खेमढरे, सतीश जाधव आणि कुटुंबीयांची ८५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये पुणे, सोलापूर आणि अहमदनगर येथील अचल मालमत्तांचा समावेश आहे. या प्रकरणी सर्वप्रथम पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, यामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू करत ही जप्तीची कारवाई केली आहे. संबंधित बँकेचे अध्यक्ष अनिल भोसले यांच्याशी मंगलदास बांदल यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्याचाच वापर करत त्यांनी स्थानिक व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या मालमत्तांची वाढीव किंमत दाखवत मोठ्या प्रमाणावर कर्जाची उचल केली.
हनुमंत खेमढरे हा या बँकेत कर्ज अधीक्षक होता. त्यानेही डोळेझाक करत या कर्जाला मंजुरी दिल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. २००७ ते २०१३ या काळात अवैधरीत्या या कर्जाचे वितरण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात ईडीने अनिल शिवाजीराव भोसले याची २६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.