Join us

भोईवाड्याला दरडीचा धोका

By admin | Published: February 28, 2015 10:58 PM

दरड कोसळून २००५ मध्ये दासगावात मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली होती. या दुर्दैवी घटनेच्या आठवणी आजही ताज्या आहेत.

सिकंदर अनवारे ल्ल दासगावदरड कोसळून २००५ मध्ये दासगावात मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली होती. या दुर्दैवी घटनेच्या आठवणी आजही ताज्या आहेत. दासगाव गावातील भोईवाडा परिसरातील ग्रामस्थ अजूनही दरडीच्या छायेत जगत आहेत. गेल्यावर्षी पावसाळ्यात भोईवाडा परिसरातील डोंगराला तडे गेले होते. काही ठिकाणी भूस्खलनही झाले होते. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दासगाव भोईवाडा परिसरावर पुन्हा एकदा दरडीचे सावट दिसत आहे. पावसाळा काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला साकडे घातले आहे.दासगाव हे महाड तालुक्याच्या बंदराचे ठिकाण आहे. दौलतगडाच्या डोंगराच्या पायथ्याशी आणि सावित्री नदीकिनारी असलेल्या डोंगर भागात दासगाव वसलेले आहे. २००५ मध्ये दासगाव गावावर दरड कोसळली होती. यावेळी ४५ ग्रामस्थ या दरडीत मृत्युमुखी पडले होते, तर १०० हून अधिक कुटुंब या दरडीमुळे बेघर झाले. त्यांना अद्याप शासनाकडून कायमस्वरूपी निवारा मिळालेला नाही. ज्या ठिकाणी दरड कोसळली त्या परिसराला लागूनच दासगाव भोईवाडा ही भोई समाजाची वस्ती आहे. सुमारे २५ ते ३० कुटुंब या परिसरात राहतात. डोंगर उतारावरच ही वस्ती असून या ठिकाणीच हा धोका गेल्या पावसाळ्यात निर्माण झाला होता. या भोईवाडा विभागाला दरडीचा धोका निर्माण झाला आहे. २०१४ च्या पावसाळ्यात या परिसरात डोंगर भागातील जमीन सुमारे २ फूट खचली असून काही प्रमाणात माती वाहून खाली आली होती. खचलेल्या जमिनीवरील भागात तीन घरे, तर खालील भागात सुमारे दहा घरे वसलेली आहेत. येथील ग्रामस्थांनी तत्काळ महाडच्या उपविभागीय कार्यालयात याची माहिती दिली होती, मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत महाड तहसील कार्यालयाला ग्रामस्थांनी संभाव्य भूस्खलनाबाबत माहिती देताच शुक्रवारी या ठिकाणी महाड तहसीलदारांनी पंचायत समिती सदस्या विनिता चांढवेकर, सरपंच प्रज्ञा खैरे, दिलीप उकीर्डे ग्रामपंचायत सदस्य, दिनेश मिंडे, पांडुरंग निवाते, यांच्यासमवेत भेट दिली आणि पाहणी केल्यानंतर भूगर्भशास्त्र विभागाला या दरडीची पाहणी करण्याचे सूचित केले.या ठिकाणी अशोक मिंडे, गणेश मिंडे, गणेश काशेकर, बशिर टोळकर, शब्बीर टोळकर, इब्राहीम टोळकर, सोनू जाधव, भिकू जाधव, दिलीप उकीर्डे यांसह अन्य तीस ते पस्तीस कुटुंबांना पावसात या दरडीचा धोका जाणवू शकतो. त्यामुळे दोन महिन्यांनंतरच पावसाळा सुरू होणार या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांना दरडीचा धोका लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ पावले उचलणे गरजेचे बनलेले आहे. ४गतवर्षी जून महिन्यात भूस्खलन झाले होते. त्यानंतर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पाहणीत हा प्रकार समोर आला होता. जिल्हा उपविभागीय अधिकारी यांनी भोईवाड्यातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे ग्रामपंचायतीला सूचित केले. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने सदरील ग्रामस्थांना नोटीस दिली होती. पावसाळ्यात दासगाव शासकीय निवासस्थानात त्यांचे स्थलांतर केले होते. मात्र आजतागायत अनेकवेळा उपविभागीय कार्यालयाच्या फेऱ्या मारूनही अद्याप कोणतीच उपाययोजना केली गेली नाही. त्यामुळे दरडग्रस्तांचे पुनर्वसन रखडले असल्याचे दासगावच्या सरपंच प्रज्ञा खैरे यांनी सांगितले.