Join us

भुजबळ जातात रेल्वेने, थोरात गेले पायी; मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरवस्थेचे धिंडवडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 7:18 AM

छगन भुजबळ यांनी ते नाशिकला रस्त्याने नाही तर रेल्वेने जातात हे स्पष्ट केले. 

मुंबई : ‘भुजबळ साहेब! आपली गाडी पुढे ठेवा, मी माझी गाडी मागे ठेवतो अन् सभागृहात मंत्री जे काही सांगत आहेत ते खरे आहे का ते तुम्हीच पाहा’, असे आव्हान समाजवादी पार्टीचे रईस शेख यांनी दिले. त्यावर, छगन भुजबळ यांनी ते नाशिकला रस्त्याने नाही तर रेल्वेने जातात हे स्पष्ट केले. 

 काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी वाहतूक कोंडीमुळे त्यांना या मार्गावर दोन किलोमीटर पायी कसे चालावे लागले होते ते सांगितले. या निमित्ताने मुंबई-नाशिक महामार्गाचे विधानसभेत धिंडवडे निघाले. या मार्गावरील कोंडीमुळे सामान्यांचे काय हाल होतात याकडे यामुळे लक्ष वेधले गेले.

अध्यक्ष नार्वेकर यांचे निर्देश 

संविधानामध्ये ‘राइट टू लाइफ राइट टू होलसम लिव्हिंग’ हे तत्त्व आहे. त्यानुसार राज्य सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी करताना नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था आधीपासूनच करणे आवश्यक आहे आणि तशी माहिती जनतेला मिळेल याचीही काळजी सरकारने करावी, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी दिले.

मुंबई-नाशिक एलिव्हेटेड एक्स्प्रेस वेचा प्रस्ताव 

महामार्गावरील मोठे  खड्डे तातडीने बुजविले जातील.  या महामार्गांतर्गत वडपे-ठाणे हा २१ किलोमीटरचा मार्ग आठपदरी करण्याचे काम सुरू असून ते ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण केले जाईल. त्यावर दोन सर्व्हिस लेनही असतील.

या महामार्गावर जड वाहनांची  विशिष्ट वेळेतच वाहतूक केली जाईल. मुंबई-नाशिक हा एलिव्हेटेड एक्स्प्रेस वे करण्याचा प्रस्तावही तयार केला जाईल, असे आश्वासन सार्वजनिक उपक्रममंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिले.

टॅग्स :छगन भुजबळबाळासाहेब थोरातनाशिक