Join us

भुजबळांनी पवारांच्या उपस्थितीत शिवसेनेचे केले कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 6:47 AM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना दिलेल्या ‘जादूच्या झप्पी’वर भुजबळांनी चिमटा काढला.

मुंबई : शिवसेना मुंबईत पाय रोवून उभी आहे कारण त्यांनी त्यांचे वॉर्ड जनसंपर्काच्या माध्यमातून बांधून ठेवले आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते प्रत्येक प्रश्नावर आंदोलन करतात. आपले कार्यकर्ते फक्त आदेश मागतात. यापुढे आदेश मागत फिरु नका. एकतर नमस्कार करा नाहीतर चमत्कार दिसेल असे काम करा, या शब्दात मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कानउघडणी करत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे कौतुक केले. ते मुंबई राष्ट्रवादीने आयोजित पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर भुजबळ यांनी सेनेचे कौतुक केल्याने भुजबळ शिवसेनेत जाणार की काय? अशी चर्चा सुरू झाली. याच कार्यक्रमात भुजबळ यांनी सरकार आरक्षण संपवण्याचा डाव आखत आहे, तो हाणून पाडण्याची गरज असल्याचे सांगितले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना दिलेल्या ‘जादूच्या झप्पी’वर भुजबळांनी चिमटा काढला. मोदी त्यांच्यापेक्षा वेगळे काय करतात? ते देखील जगातल्या विविध देशातल्या नेत्यांना जादूची झप्पीच तर देतात, असेही ते म्हणाले. महाराष्टÑात बुलेट ट्रेन लादण्यात आली. मुंबईचे गुजरात करायचे आहे का?, असा सवालही त्यांनी केला.जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मोदी अयशस्वी ठरल्याचे पवार म्हणाले. गोमांसच्या संशयावरून ‘मॉब लिंचिंग’चे प्रकार घडत आहेत. ही अत्यंत चिंताजनक आणि निंदनिय गोष्ट आहे. दादरीमध्ये काही वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला होता. एकाच्या घरात गोमांस असल्याच्या संशयावरून जमावाच्या मारहाणीत त्याला जीव गमवावा लागला होता. मात्र, ते गोमांस नव्हतेच असा चौकशीचा अहवाल नंतर समोर आला होता. आता त्या व्यक्तीच्या कुटुंबाची जबाबदारी कोणाची? असा सवालही पवार यांनी केला.पंतप्रधानांनी केला जनतेचा भ्रमनिरासपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने विश्वासाने निवडून दिले होते. मात्र त्या विश्वासास ते पात्र ठरले नाहीत. त्यांच्या काळात माणसा-माणसांमध्ये, दोन समाजामध्ये आणि राज्यांमध्येही एकवाक्यता राहिलेली नाही. समाजात जातीय तेढ निर्माण झाली आहे. जनतेचा पूर्ण भ्रमनिरास करण्याचे काम त्यांनी केले आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

टॅग्स :छगन भुजबळराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारउद्धव ठाकरेशिवसेनाराहुल गांधीनरेंद्र मोदी