बाजारबुगण्या म्हणत केसरकरांवर पलटवार, भुजबळ, राणे अन् राज ठाकरेंचा असाही उद्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 08:07 AM2022-10-11T08:07:33+5:302022-10-11T08:18:45+5:30
दिपक कसेरकर यांचा पहिल्यांदाच शिवसेनेनं खरपूस समाचार घेतला आहे. बाजारबुणग्या म्हणत केसरकरांवर शिवसेनेनं वार केला आहे.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील वाद टोकाला गेला असून शिवसेना कोणाची... ठाकरेंची की शिंदेंची? याचा फैसला आता निवडणूक आयोगात होणार आहे. पण तत्पूर्वी, अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तात्पुरते पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवून ठेवले आहे. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरेंच्या टिकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिलंय. आता, दिपक कसेरकर यांचा पहिल्यांदाच शिवसेनेनं खरपूस समाचार घेतला आहे. बाजारबुणग्या म्हणत केसरकरांवर शिवसेनेनं वार केला आहे.
केसरकर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले होते, तसेच एखादा निर्णय तुमच्याविरुद्ध गेल्यानंतर संबंधित संस्थेला दोष देणे चुकीचं आहे, धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळेल, न्याय होईल, असे केसरकर यांनी म्हटले होते. शिवसेनेच्या मुखपत्रातून केसरकर यांच्यावर तोफ डागण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी कडक शब्दात केसरकर यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेवरील अन्यायाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्राचे मन पेटून उठले असताना मिंधे गटाचे प्रवक्ते व राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे सत्य व न्यायाचा विजय असल्याचे म्हटले आहे. जगात न्याय आहे असे केसरकरांसारख्या बाजारबुणग्यास वाटणे साहजिकच आहे. कारण हा माणूस कधीच कुणाचा होऊ शकला नाही. अनेक पक्षांत फिरून हे महाशय शिवसेनेत आले व मंत्रीपदाचे गाजर दिसताच मिंधे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेवर दिल्लीचा आघात म्हणजे महाराष्ट्राचा घात हा स्वाभिमानी विचार त्यांच्या मनालाही शिवणार नाही, अशा शब्दात शिवसेनेनं केसकरांवर पलटवार केला आहे. तसेच, भारतीय जनता पक्ष व त्यांचे सध्याचे सूत्रधार हे नामर्द आहेत म्हणून त्यांनी थेट लढण्याऐवजी शिवसेनेचे अस्तित्व कागदोपत्री संपविण्याचा दळभद्री प्रकार केला, असेही म्हटले
भुजबळ, राणे, राज ठाकरेंनीही असे कृत्य केलं नाही
याआधी छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे नेते शिवसेनेतून बाहेर पडले. राज ठाकरे यांनीही त्यांचा मार्ग स्वीकारला. त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर आणि व्यक्तिशः आमच्यावर कठोर शब्दांत टीका केली, पण ज्या शिवसेनेचा जन्म प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादातून झाला, ज्या प्रबोधनकारांनी मराठी माणसांच्या संघटनेस 'शिवसेना' हे ज्वलंत नाव दिले व ज्या शिवसेनेसाठी आपले सुपुत्र बाळ केशव ठाकरे यांना महाराष्ट्र सेवेसाठी अर्पण केले, त्या शिवसेनेचे अस्तित्व मिटविण्याचे अधम व नीच कृत्य जसे एकनाथ शिंदे या गारद्याने केले, तसे या मंडळींनी केले नाही. शिवसेना म्हणजे सर्वच राजकीय पक्षांतील मराठी जनांची माऊली आहे. त्या माऊलीवर हात टाकण्याचे व्यभिचारी कृत्य ज्यांनी केले त्यांना महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे तळतळाट लागून, त्यांचा राजकीय निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही, असा संताप महाराष्ट्राच्या घराघरांतून व्यक्त होत आहे.
काय म्हणाले होते केसरकर
आम्ही निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी करणार आहोत. आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. कारण, शेवटी खऱ्याला न्याय मिळत असतो, आमची बाजू खरी आहे, त्यामुळे हा न्याय निश्चितपणे होईल, असे दिपक केसरकर यांनी म्हटले. तसेच, आम्ही ८ ऑगस्ट, २३ ऑगस्ट, २३ सप्टेंबर, ७ ऑक्टोबर रोजी आम्ही निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र दिली आहेत. त्यामुळे, आमच्याकडून द्यायचं काहीच शिल्लक नाही, ज्यांच्याकडे काही नाहीच, ज्यांची बाजूच खोटी होती. तरीही ते आज म्हणतायंत की आम्ही त्यांचं चिन्ह गोठवायला निघालोय, पण चिन्ह आमचं आहे, चिन्ह गोठल्याचं दु:ख आम्हाला झालं पाहिजे, असे म्हणत केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.