भुजबळ, वडेट्टीवारांकडून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न - विनायक मेटे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:24 AM2020-12-14T04:24:39+5:302020-12-14T04:24:39+5:30
विनायक मेटे यांचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मराठा समाजातील कोणत्याही नेत्याने ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देण्याची मागणी ...
विनायक मेटे यांचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठा समाजातील कोणत्याही नेत्याने ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देण्याची मागणी केली नव्हती, तरीही अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे हे राज्यातील वातावरण खराब करत आहेत. ओबीसींचे मोर्चे, आंदोलन सरकार पुरस्कृत आहेत का, सरकारला मराठा आरक्षण द्यायचे नाही का, तसेच सरकारने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे का, असे प्रश्न शिवसंग्रामचे नेते, आमदार विनायक मेटे यांनी रविवारी उपस्थित केले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आयोजित पत्रकार परिषदेत मेटे म्हणाले की, आरक्षणाबाबत सरकार ठोस पावले उचलत नसल्याने, यामुळे मराठा तरुणांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे उद्या काही परिस्थिती निर्माण झाली, तर त्याला सरकारच जबाबदार असेल. ठाकरे सरकारमधील ओबीसी मंत्री आणि राज्यातील ओबीसी नेते मराठा आरक्षणावरून बेताल वक्तव्य करत आहेत. वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार अशा नेत्यांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरले आहेत किंवा सरकारनेच यासाठीचा कार्यक्रम हाती घेतल्याची शक्यता आहे, असा आरोप मेटे यांनी केला.
दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा झाली पाहिजे. मराठा आमदार आणि मंत्र्यांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी सर्व मराठा आमदारांना पत्र लिहिल्याचेही मेटे यांनी सांगितले.
* ‘मराठा आमदार गप्प का?’
ओबीसी नेते, मंत्री आरक्षणावर बोलत असताना, सरकारमधील मराठा मंत्री गप्प आहेत. छगन भुजबळ ओबीसी आरक्षणावर बोलतात. मग उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षणावर का बोलत नाहीत, विजय वडेट्टीवार बोलत असतील, तर मग महसूलमंत्री बाळासाहेब थोरात का भूमिका घेत नाहीत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई मौन बाळगून का आहेत? मराठा आमदारही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर गप्प का आहेत? असे प्रश्नही मेटे यांनी केले.