Join us  

भुजबळांची अटक म्हणजे काळाने उगवलेला सूड! - उद्धव ठाकरे

By admin | Published: March 16, 2016 9:36 AM

गृहमंत्री असताना आपले न ऐकणा-या नेत्यांना पोलिसी यंत्रणेचा गैरवापर करून तुरुंगात पाठवणारे भुजबळ आज तुरूंगात गेले आहेत. हा राजकीय नव्हे तर काळाने उगवलेला सूड आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - ' गृहमंत्री असताना आपले न ऐकणा-या अनेक नेत्यांना खोटी प्रकरणे तयार करून, पोलिसी यंत्रणेचा गैरवापर करून तुरुंगात पाठवणारे भुजबळ आज त्याच मार्गाने तुरूंगात गेले आहेत. हा राजकीय नव्हे तर काळाने उगवलेला सूड आहे ' अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आल्यानंतर बराच गदारोळ माजला. पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी ही अटक म्हणजे राजयकीय सूड असल्याचा आरोप केला होता. 'हा अन्याय आहे. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई होत आहे!’ असे खुद्द भुजबळ म्हणाले होते. मात्र उद्धव यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून त्यांना चांगलीच चपराक लगावत 'राजकीय स्वार्थासाठी झालेले (भुजबळ यांचे) हे अध:पतन आहे' असल्याची टीका केली आहे. या अध:पतनास भुजबळ स्वत:च जबाबदार असल्याचा टोलाही उद्धव यांनी लगावला.
 
काय म्हटले आहे अग्रलेखात :
- छगन भुजबळ यांना अखेर अटक झाली आहे. भुजबळ हे शिवसेनेत होते तेव्हा त्यांना अनेकदा अटक झाली. या अटका महाराष्ट्र, मराठी प्रश्‍नांसंदर्भात केलेल्या आंदोलनासंदर्भात होत्या. मुंबईचे महापौर असताना भुजबळ वेशांतर करून बेळगावात पोहोचले. त्यांनी सीमा भागातील मराठी माणसांवर होणार्‍या अन्यायाविरोधात आंदोलन करताच निर्दयी कानडी पोलिसांनी त्यांना अटक केली. या अटकेमुळे भुजबळ हीरो झाले, पण भुजबळांना आता झालेली अटक ही भ्रष्टाचार, लपवाछपवी अशा गुन्ह्यांसाठी आहे. त्यांना अटक झाली म्हणून कुणाला वाईट वगैरे वाटल्याचे दिसत नाही. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री व गृहमंत्री असताना भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेले घोटाळे हे त्यांच्या अटकेचे कारण आहे. शिवसेनेत असताना ते महाराष्ट्राच्या प्रश्‍नांसाठी तुरुंगात गेले. काँग्रेस-राष्ट्रवादीत असताना भ्रष्टाचारासाठी तुरुंगात जात आहेत. हा फरक समजून घेतला पाहिजे. राजकीय स्वार्थासाठी झालेले हे अध:पतन आहे. 
- दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम व्यवहारात भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांनी कोट्यवधींचा फायदा करून घेतला. भ्रष्ट मार्गाने मिळवलेला पैसा बेकायदेशीरपणे परदेशात नेला. त्यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान झाले. या सर्व प्रकरणांत पुतणे समीर भुजबळ आधीच तुरुंगात पोहोचले आहेत. हा काळाने घेतलेला सूड आहे. 
- अटकेनंतर भुजबळ तडफडून म्हणाले, ‘हा अन्याय आहे. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई होत आहे!’ भुजबळ गृहमंत्री असताना त्यांनी काहीकरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तुरुंगात पाठवण्याचा विडाच उचलला होता! शिवसेनाप्रमुखांचा गुन्हा काय? तर त्यांनी देशाला जागे करणारे प्रखर हिंदुत्ववादी भाषण केले. या गुन्ह्याखाली शिवसेनाप्रमुखांच्या अटकेचा अट्टहास करून महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला वेठीस धरण्याचा ‘द्रोह’ तेव्हा भुजबळ यांनी केला व तेसुद्धा राजकीय सूड आणि व्यक्तिगत द्वेषाचेच राजकारण होते. पण शिवसेनाप्रमुखांच्या अटकेच्या आगीत शेवटी भुजबळ यांचेच हात भाजले. शिवसेनाप्रमुख अग्निदिव्यातून अधिक उजळून तेजाने बाहेर पडले. त्यामुळे राजकीय सूडावर आक्रोश करण्याचा हक्क भुजबळांनी गमावला आहे. 
- शिवसेनाप्रमुखांनी घडवलेल्या एका कार्यकर्त्याने काँग्रेस व राष्ट्रवादीत जाऊन स्वत:ची कशी फरफट करून घेतली याचे भुजबळ हे आणखी एक उदाहरण आहे. गृहमंत्री म्हणून भुजबळांनी अनेकांना तुरुंगात पाठवले. ज्यांनी त्यांचे ऐकले नाही अशा अनेकांना खोटी प्रकरणे तयार करून, पोलिसी यंत्रणेचा गैरवापर करून तुरुंगात पाठवले. आज भुजबळही त्याच मार्गाने तुरुंगात गेले व त्यांची वकिली करणार्‍यांचे आवाजही क्षीण झाले आहेत. सत्ता व संपत्तीतून निर्माण झालेले हे चक्रव्यूह. मंत्री म्हणून भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांनी शेकडो कोटींचे व्यवहार केले. पण फक्त १३ कोटींचे हिशेब देता आले नाहीत म्हणून ते तुरुंगात गेले आहेत. 
- तेलगी प्रकरणातही त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. पण महाराष्ट्र सदन प्रकरणात ते आत गेले. आसमान से गिरे और खजूर में लटके! हे लटकणे आणखी किती वर्षे असेल ते कोणीच सांगू शकत नाही. या अध:पतनास भुजबळ स्वत:च जबाबदार आहेत. आज त्यांच्यासाठी जे लोक रस्त्यावर उतरले ते उद्यापासून स्वत:च्या कामधंद्याला लागतील. जग कुणासाठी थांबत नाही, त्यामुळे ते भुजबळांसाठीही थांबणार नाही.