भुजबळांच्या जामिनावर २८ नोव्हेंबरला सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 05:31 AM2017-11-25T05:31:24+5:302017-11-25T05:31:42+5:30
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जामिनावर २८ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जामिनावर २८ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. ईडीचे वकील हितेन वेणेगावकर हे शुक्रवारी झालेल्या सुनावणीला हजर नव्हते़ उच्च न्यायालयात इतर काम असल्याने ते तेथे आहेत़ पुढच्या आठवड्यात त्यांच्या सहकारी वकिलाचा विवाह आहे़ त्यामुळे भुजबळ यांच्या जामिनासंदर्भातील अर्जावरील सुनावणी तहकूब करावी, अशी विनंती अॅड़ तेजस धोत्रे यांनी विशेष न्यायाधीश सलमान आझमी यांच्यासमोर केली़ ही सुनावणी २ डिसेंबरला ठेवता येईल, अशी सूचना विशेष न्यायाधीश आझमी यांनी केली़ मात्र ही सुनावणी २८ नोव्हेंबरला घ्यावी, अशी मागणी भुजबळ यांचे वकील सज्जन यादव यांनी केली़ ती ग्राह्य धरत न्यायालयाने ही सुनावणी २८ नाव्हेंबरपर्यंत तहकूब केली़ मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला जामीन मंजूर होऊ न देणारे कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे़ त्या निकालाची प्रत भुजबळ यांच्या वकिलांनी विशेष सत्र न्यायालयात गुरुवारी सादर केली़ त्यामुळे आता भुजबळ यांना जामीन मिळणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़ महाराष्ट्र सदन बांधकाम व अन्य घोटाळ्यांप्रकरणी गेल्या वर्षी मार्च महिन्यात भुजबळ यांना अटक झाली़ आता ते आर्थररोड कारागृहात आहेत़ याआधीही त्यांनी जामिनासाठी विशेष सत्र न्यायालय व उच्च न्यायालयात अर्ज केला होता़ हे अर्ज दोन्ही न्यायालयांनी फेटाळून लावले. त्यानंतर भुजबळ यांनी नव्याने जामिनासाठी अर्ज केला़ या अर्जावर विशेष न्यायाधीश आझमी यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे़