Join us  

हेमा मालिनींच्या संस्थेवर ‘भूखंड कृपा’

By admin | Published: December 30, 2015 1:16 AM

प्रख्यात अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी यांच्या नाट्यविहार कला केंद्र चॅरिटी ट्रस्ट या संस्थेला सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी आंबिवली, अंधेरी (मुंबई) येथील २ हजार चौरस मीटरचा

मुंबई : प्रख्यात अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी यांच्या नाट्यविहार कला केंद्र चॅरिटी ट्रस्ट या संस्थेला सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी आंबिवली, अंधेरी (मुंबई) येथील २ हजार चौरस मीटरचा भूखंड राज्य सरकारने मंगळवारी दिला. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी याबाबतच्या आदेशाची प्रत हेमामालिनी यांच्याकडे मंगळवारी दिली. शास्त्रीय संगीत, कला, नृत्य इत्यादी प्रयोजनासाठी सांस्कृतिक संकुल निर्माण करण्यासाठी हेमामालिनी यांच्या ट्रस्टने १९९६पासून हा भूखंड राज्य सरकारला मागितला होता. भूखंड देताना राज्य शासनाने काही अटी घातल्या असून, त्यानुसार ट्रस्टने सदर जमिनीच्या नेमून दिलेल्या भागावर वृक्षराजी असलेले उद्यान स्वखर्चाने विकसित करून त्याची देखभालही करेल. तसेच, हे उद्यान जनतेसाठी खुले ठेवावे लागणार आहे. याखेरीज, ट्रस्टने त्यांचे प्रस्तावित कला केंद्राचे बांधकाम जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळाल्यापासून दोन वर्षांच्या आत पूर्ण करावयाचे आहे. संस्था धर्मादाय स्वरूपाची असल्याने तिला नफा कमावता येणार नाही. संस्थेने प्रकल्प खर्चापैकी २५ टक्के रक्कम मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे भरावयाची असून, उर्वरित ७५ टक्के रक्कम ट्रस्ट कशी उभी करणार आहे, याचा पुरावा जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावा लागणार आहे. याची पूर्तता झाल्यानंतरच जमीनवाटपाचे अंतिम आदेश जिल्हाधिकारी काढतील. (विशेष प्रतिनिधी)