आज बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:07 AM2021-03-31T04:07:01+5:302021-03-31T04:07:01+5:30
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन करण्यात येणार आहे. ...
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन करण्यात येणार आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधक नियमावली लागू असल्याने निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, स्मारक समितीचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्कजवळील जुन्या महापौर निवासात बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय मागील फडणवीस सरकारच्या काळात झाला होता. जागा हस्तांतरणासह स्मारकासाठी विश्वस्त समिती तयार करण्याचे काम झाले होते. यावेळच्या अर्थसंकल्पात स्मारकासाठी ४०० कोटींच्या निधींची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर आता स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला गती देण्यात येणार आहे. दोन टप्प्यात स्मारकाचे काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकूलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामे केली जाणार आहेत. या सर्व कामांसाठी साधारण २५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्युअल रियालिटी शो आदी तांत्रिक बाबींवर काम केले जाईल. इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना ही कामे केली जाणार आहेत. त्यासाठी १५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.