Join us  

मीरा भाईंदरमध्ये मराठा भवन व विद्यार्थी वसतिगृह इमारतीचे शनिवारी होणार भूमिपूजन

By धीरज परब | Published: October 13, 2022 8:07 PM

भूमिपूजनासाठी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची असणार उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर मध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व मराठा भवनची १६ मजली इमारत साकारणार असून येत्या शनिवार १५ ऑक्टोबर रोजी त्याचे भूमिपूजन होणार आहे. राज्यातील हे पहिले मराठा भवन व वसतिगृह  इमारत असणार आहे अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. मीरा भाईंदर शहरात मराठा भवन हवे अशी मागणी मराठा संघ व मराठा समाजातील प्रतिनिधींनी सातत्याने चालवली होती. आ. सरनाईक यांनी या बाबत काशीमीरा महामार्गावर नुकतेच उद्घाटन झालेल्या भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहा जवळ या साठी जागा सुचवली असता शासनाने व पालिकेने निश्चित केली होती.

शासनाकडे पाठपुरावा केल्या नंतर इमारतीचे बांधकाम हे विकासकाला कडून बांधकाम टीडीआर मधून करून घेण्यास मंजुरी मिळाली . या इमारतीमध्ये अंतर्गत सजावटीच्या कामासाठी १ कोटी रुपये राज्य शासनाकडून आधीच महापालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. नरवीर तानाजी मालुसरे मराठा भवन असे नामकरण सुद्धा मंजूर झाले आहे. शनिवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भूमिपूजन होणार असून युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले ,  केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील , पालकमंत्री शंभूराजे देसाई , उद्योगमंत्री उदय सामंत , आमदार नितेश राणे , आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले , ज्योतीताई विनायक मेटे आदी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. 

मराठा भवन इमारतीस मंजुरी मिळूनच कामास सुरवात होणार असल्याने शहरातील मराठा संघाचे सुरेश दळवी , रमेश पवार , सुभाष काशीद , विनोद जगताप , मनोज राणे , अंकुश मालुसरे , प्रवीण उतेकर , देविदास सावंत आदींनी आ . सरनाईक यांची भेट घेऊन आभार मानले व चर्चा केली.  मराठा भवन व विद्यार्थी वसतिगृहची १६ मजल्यांची इमारत असणार आहे. सुरवातीच्या ४ मजल्यांवर मराठा भवन , बहुउद्देशीय सभागृह आदी असेल . वरील १२ मजले वसतिगृहासाठी असणार आहेत. १०० विद्यार्थी व १०० विद्यार्थिनी असे २०० विद्यार्थ्यांच्या राहण्याची क्षमता असणार आहे. वसतिगृह शासनाच्या अख्त्यारीखाली चालणार असून यामुळे शिक्षणासाठी येणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांची राहण्याची सोया होणार आहे .  साधारण २ वर्षात इमारतीचे काम पूर्ण होणार असून बांधकाम टीडीआर विकासकाला देऊन ही इमारत बांधली जाणार असल्याने महापालिकेचा पैसा खर्च होणार नाही असे आ. सरनाईक यांनी सांगितले. 

मराठा भवन महापालिका अधिनियमात बसत नाही- मेहता

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले कि , आम्ही मराठा भवनचे स्वागत करतो. मराठा समाजाला इतकीच विनंती आहे कि , महापालिका अधिनियमा नुसार महापालिका अश्या कोणा व्यक्ती विशेष साठी वास्तू बनवू शकत नाही . त्यामुळे ती जागा हस्तांतरित करून घेण्याचा करारनामा करून घ्यावा जेणे करून नंतर अन्याय होणार नाही.

टॅग्स :मीरा रोडमीरा-भाईंदर