२७ जुलैला बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन - जितेंद्र आव्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:06 AM2021-07-23T04:06:28+5:302021-07-23T04:06:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला उच्चाधिकार समितीने मान्यता दिली असून, या चाळींच्या विकासाचा प्रश्न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला उच्चाधिकार समितीने मान्यता दिली असून, या चाळींच्या विकासाचा प्रश्न सुटला आहे. २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुनर्विकासाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी दिली.
मंत्री आव्हाड यांनी गुरुवारी रात्री टि्वटरवर याबाबतची घोषणा केली. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. गुरुवारी उच्चाधिकार समितीने पुनर्विकासाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचे २७ जुलैला मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात येणार आहे. मुंबई महाराष्ट्रात सामील झाल्यापासूनचा हा सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे. इतकी वर्षे बीडीडी चाळींच्या छोट्या जागेत राहिलेल्या नागरिकांसाठी हा प्रकल्प दिलासादायक ठरणार आहे. आज जिथे राहतात तिथेच नवीन घरे येथील रहिवाशांना मिळणार आहेत, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. मी स्वतः ताडदेवच्या चाळीत वाढलो. त्यामुळे चाळकऱ्यांच्या व्यथांची मला जाणीव आहे. त्यामुळे या पुनर्विकासाचा निर्णय माझ्यासाठी मोठ्या आनंदाचा असल्याचेही आव्हाड यांनी यासंदर्भात जारी केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.