Join us  

वेरवली ‘हॉल्ट’ स्थानकाचे भूमिपूजन

By admin | Published: October 16, 2015 9:10 PM

सुरेश प्रभू : लांजा-राजापूर तालुक्यांना विकासाची संधी

लांजा : लांजा व राजापूर रत्नागिरी जिल्ह्याची शेवटची गावे असल्याने या तालुक्यांचा विकास गेली पन्नास ते साठ वर्षे रखडला होता. मात्र, शिवसेना - भाजपची सत्ता आल्यानंतर या तालुक्यातील विकासकामांना खरी चालना मिळाली असून, या तालुक्यांतील रखडलेल्या विकासकामांचे ठिकाणी काम करण्याची संधी आहे, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी वेरवली येथे केले.तालुक्यातील वेरवली येथे ‘हॉल्ट’ रेल्वे स्थानकाचे भूमिपूजन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते व्यासपीठावरुन बोलताना प्रभू पुढे म्हणाले की, लांजा व राजापूर तालुक्यातील जनता आजही आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. येथे राजकीयदृष्ट्या कुणाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे याची जाणीव येथील जनतेला आहे. आमच्या पाठीशी उभे राहून खऱ्या अर्थाने जनतेने विकासाला साथ दिली आहे. वेरवली येथे रेल्वेस्थानक व्हावे अशी अनेक दिवसांपासूनची लोकांची मागणी होती. त्यानुसार रेल्वे स्टेशनला मान्यता मिळाली आहे. राजापूर व लांजा अशा दोन ठिकाणी होणाऱ्या या रेल्वे स्टेशनला ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. एका वर्षामध्ये ही दोन्ही रेल्वेस्टेशन बांधून पूर्ण होणार आहेत. त्यामुळे या परिसरातील लोकांचा फायदा होणार आहे. रेल्वेचा फायदा होईल तसाच समाजाचाही फायदा झाला पाहिजे.वेरवली येथील लोकांची रेल्वे स्टेशनची मागणी होती. त्यांची इच्छा पूर्ण करण्यात मी यशस्वी झालो याचा मला अभिमान वाटतो, असे शेवटी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, आ. राजन साळवी, हुस्रबानू खलिपे, माजी आमदार बाळ माने, जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, पंचायत समिती सभापती दीपाली दळवी, उपसभापती आदेश आंबोलकर, जिल्हा परिषद बांधकाम सभापती अनिल शिवगण, भाजपचे तालुकाध्यक्ष विजय कुरुप, कोकण रेल्वेचे व्यवस्थापक भानूप्रकाश तायल, वेरवली सरपंच पवार, सचिन वहाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लांजा तालुक्यातील अनेक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)एक वर्षात पूर्ण : चार कोटींचा निधीलांजा तालुक्यातील वेरवली येथे कोकण रेल्वेचे स्थानक व्हावे अशी येथील जनतेची मागणी अनेक वर्षे सुरू होती. या स्थानकाला मान्यता मिळाली आहे. राजापूर व लांजा अशा दोन ठिकाणी होणाऱ्या रेल्वे स्टेशनला ४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. एका वर्षामध्ये ही दोन्ही रेल्वे स्थानक बांधून पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वेरवली येथील रेल्वे स्थानकाच्या भूमिपूजनामुळे येथील रहिवाशांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.कुवे येथे कारखानाकुवे येथे खताचा कारखाना उभारण्यात आला आहे. तो कारखाना एक संस्था चालवत आहे. हा खत कारखाना वाढवण्याचा आपला मानस आहे.