मुंबई : मध्य मुंबईतील वाहन प्रवास सुखकर करणाऱ्या कलानगर जंक्शन फ्लायओव्हरच्या एका मार्गिकेचे लोकार्पण आज (रविवार) सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. त्याचवेळी मुंबई ट्रान्स हार्बर मार्ग, आणि पश्चिम मुंबई यांना जोडणाऱ्या वरळी-शिवडी या उन्नत जोडमार्गाच्या कामाचे भू्मिपूजनही केले जाईल. तसेच बीकेसीमध्ये एमएमआरडीएने केलेल्या सुविधांचेही लोकार्पण केले जाणार आहे.
फ्लायओव्हरच्या एकेका मार्गिकेचे लोकार्पण करण्याचा प्रघात गेल्या काही काळापासून मुंबई महानगर प्रदेशात रूढ झाला आहे. त्याच मालिकेत रविवारी कलानगर जंक्शनवरील एक मार्गिका खुली होत आहे. वांद्रे-कुर्ला संकुलाकडून वांद्रे-वरळी सागरी मार्गाकडे जाणाऱ्या मार्गिकेचे लोकार्पण होत आहे, तर सी लिंककडून बीकेसीकडे येणारी मार्गिका तसेच, धारावी जंक्शनकडून सी लिंककडे येणाऱ्या मार्गिकेचे काम अजूनही सुरू आहे.
वरळी-शिवडी जोडमार्ग
शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेपासून पूर्व मुक्त मार्गावरून, शिवडी येथे हार्बर रेल्वे मार्गाच्या वरून, मोनोरेल, डॉ. आंबेडकर मार्गावरील उड्डाणपूल, प्रभादेवी येथे मध्य व पश्चिम रेल्वे मार्गाच्या वरून ओलांडून व सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपूल पार करून, डॉ. ॲनी बेझंट मार्ग पार करून, वरळी येथे नारायण हर्डीकर मार्गापर्यंत वरळी-शिवडी हा उन्नत जोडरस्ता बांधला जाणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएला १२७६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
याच कामामध्ये शिवडी रेल्वेस्थानक येथील रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम व प्रभादेवी रेल्वेस्थानक येथील १०० वर्षांहून जुना रेल्वे उड्डाणपूल पाडून त्याजागी नव्याने डबलडेकर फ्लायओव्हर बांधण्याच्या कामाचा समावेश आहे. या मार्गामुळे पश्चिम मुंबईतून मुंबई ट्रान्स हार्बर मार्ग आणि पुढे नवी मुंबई विमानतळ असा थेट प्रवास करणे शक्य होणार आहे.