मुंबई : मराठवाड्यातील पैठण विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २०१९ साली दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, वैजापूर येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. राजू डोंगरे व संभाजीनगर येथील बालरोगतज्ज्ञ व एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. शोएब हाश्मी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी ठाकरे गटात प्रवेश केला. दत्ता गोर्डे हे मंत्री संदीपान भुमरे यांचे कट्टर विरोधक आहेत.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, किनारपट्टीवर निसर्ग आणि तौक्ते ही दोन चक्रीवादळे आपटली होती, पण रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत फिरताना चार दिवसांत एक वेगळेच वातावरण दिसले, हे भगवे वादळ होते आणि हे वादळ आता दिल्लीच्या तख्तावर आदळणार आहे. महाराष्ट्रच देशाची दिशा ठरवणार आहे. मातोश्रीवर किंवा मी जिथे जातो तिथे स्थानिक पातळीवर भाजपतील लोक शिवसेनेत येत आहेत. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात शिवसेनेसोबत येत आहे. कारण जो भ्रम, संभ्रम निर्माण केला जात आहे तो खोटा आहे. गेल्या १० वर्षांत भाजपने ओंगळवाणा कारभार केला तो आता उघडा पडला आहे. या कारभाराला संपवण्यासाठी आपण सगळे शिवसेनेसोबत आला आहात, असे ते म्हणाले.
मंत्री भुमरे यांना शह
पैठण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या शिवसेना ठाकरे गटातील प्रवेशाने मंत्री संदीपान भुमरे यांना शह दिला आहे. गोड मूळचे शिवसेनेचे, ते उघडपणे भुमरे यांच्याविरोधात भूमिका घेत असल्याने त्यांची हकालपट्टी केली होती. २०१९ मध्ये पैठण विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढविली. त्यात भुमरे यांनी त्यांचा १५ हजार मतांनी पराभव केला होता.