भांडुपचा श्वास कोंडलेलाच, रेल्वे स्थानकाचा दुहेरी वाटेचा प्रश्न कधी सुटणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 06:43 AM2017-10-24T06:43:21+5:302017-10-24T15:37:07+5:30

Bhupukh breathed his breath, and when will the railway station double the question? | भांडुपचा श्वास कोंडलेलाच, रेल्वे स्थानकाचा दुहेरी वाटेचा प्रश्न कधी सुटणार ?

भांडुपचा श्वास कोंडलेलाच, रेल्वे स्थानकाचा दुहेरी वाटेचा प्रश्न कधी सुटणार ?

Next

मनीषा म्हात्रे 
मुंबई : रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी असलेली एकच वाट, अरुंद स्टेशन रोडवरील बेस्टच्या बसगाड्या, रिक्षा, असंख्य फेरीवाले आणि या फेरीवाल्यांकडून भाज्या, फळे विकत घेणा-या चाकरमान्यांची भाऊगर्दी; त्यामुळे घाईच्या दोन्ही वेळांमध्ये भांडुप रेल्वे स्थानक किंवा स्थानकातून लाल बहादूर शास्त्री मार्ग गाठताना जीव मेटाकुटीला येतो. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भांडुप रेल्वे स्थानकाचा दुहेरी वाटेचा प्रश्न कधी सुटणार, याकडे भांडुपकरांचे लक्ष आहे.
औद्योगिक वसाहतीमधले भांडुप हे महत्त्वाचे उपनगर. यात घाम गाळणारा कुशल, अकुशल कामगार आणि मजूर वर्ग हळूहळू भांडुप पश्चिमेकडील डोंगराळ भागात चाळी बांधून वसला. कोकणातून पोटापाण्यासाठी मुंबईकडे निघालेला चाकरमानी लालबाग-परळमध्ये निवारा अपुरा पडू लागल्याने भांडुपकडे वळला. पाहता पाहता भांडुप पश्चिमेकडील परिसर दाट लोकवस्तीचा बनला. कालांतराने भांडुपमधल्या मोठ्या कंपन्या बंद झाल्या. त्या जागेवर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. बहुतांश भांडुपकर बैठ्या चाळींमध्ये वास्तव्यास आहेत.
या स्थानकातून पश्चिमेकडे बाहेर पडण्यासाठी एकच वाट आहे. त्यामुळे एकाचवेळी जास्त लोकल स्थानकावर आल्या तर या वाटेवर प्रवाशांची एकच गर्दी होते. थोडे पुढे आल्यावर या वाटेच्या मधोमध बेस्टचे कार्यालय आहे. त्यामुळे वाट दोन चिंचोळ्या मार्गांमध्ये विभागली जाते. आणखी पुढे आल्यावर बेस्टचा डेपो आणि रिक्षा स्टँड एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळे रिक्षांच्या गोतावळ्यातून डेपोपर्यंत येताना बेस्टच्या मिनी बसेस स्टेशन रोडवर अडकून पडतात. हा मार्ग फेरीवाल्यांमुळे आणखी तोकडा पडतो. परिणामी, बेस्ट बसच्या मागे अन्य वाहने खोळंबून पडतात. भांडुप स्थानकातून एलबीएसला जोडणारा स्कायवॉक असून नसल्यासारखा आहे. अधेमध्ये खाली उतरायला पायºया नसल्याने स्कायवॉक मोकळाच असतो.
भांडुप स्थानक आणि स्टेशन रोडची कोंडी फोडण्यासाठी दुसºया एन्ट्री एक्झिटचा पर्याय आहे. पूर्वी १ नंबर फलाटाला लागून असलेल्या जी.के.डब्लू. कंपनीने बाहेर पडण्यासाठी एक तात्पुरती मार्गिका खुली ठेवली होती. ज्याचा वापर प्रवासी करत. मात्र कंपनी बंद पडली आणि ती मार्गिकाही. भांडुप स्थानकातील गर्दी आणि स्टेशन रोडवरील कोंडी लक्षात घेऊन भांडुप विकास मंचचे अध्यक्ष जितेंद्र घाडीगांवकर यांनी दुसºया मार्गिकेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. एलबीएसवरील ईश्वर नगर येथून थेट फलाट क्रमांक १ला जोडणाºया रस्त्याचा पर्याय घाडीगांवकर यांनी सुचवला. त्यास मध्य रेल्वे आणि पालिकेने मान्यता दिली. मात्र या रस्त्यातील जयश्री कंपनीच्या मालकाने न्यायालयात धाव घेतली. पुढे घाडीगांवकर यांनी मालकाची समजूत काढली. आता मालकही या रस्त्यासाठी राजी झालाय. मात्र हे श्रेय लाटण्यासाठी पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेने नव्याने सर्व्हे करण्याच्या नावाखाली हे काम रोखून धरल्याचा आरोप घाडीगांवकर करतात.
>शहरातल्या बहुसंख्य स्थानकांना एकापेक्षा जास्त बाहेर पडण्याचे मार्ग आहेत. अगदी कांजूरमार्गसारख्या छोट्या स्थानकातही दोन मार्ग आहेत.
भांडुप स्थानकातून बाहेर पडण्यासाठी कायमस्वरूपी दुसरी एन्ट्री एक्झिट सुरू झाली तर काजूपाडा, कोकण नगर, महाराष्ट्र नगर या भागातल्या रहिवाशांना हा मार्ग शॉर्टकट ठरू शकेल. त्यांना आपले घर गाठण्यासाठी स्टेशन रोडचा वळसा घालावा लागणार नाही. फलाटांवर येणारी किंवा उतरणारी गर्दी विभागली जाईल. दोन्ही वाटांवर रिक्षा उभ्या राहतील.
त्यामुळे स्टेशन रोडवरला भार निश्चितपणे कमी होईल.
- जितेंद्र घाडीगांवकर, अध्यक्ष,
भांडुप विकास मंच
>सर्वांचे दुर्लक्षच....
भांडुप रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी दोन मार्ग सुचवलेले. मात्र सुरुवातीला रेल्वे आणि स्थानिक रहिवाशांचा विरोधामुळे ते रखडले. अशात पुन्हा जी.के.डब्लू. कंपनीतून मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. याबाबतचा प्रस्ताव डीपीमध्येही समावेश करून घेतला. मात्र सध्या पद नसल्याने कामाला उशीर होत आहे. तरीही प्रयत्न सुरू आहेत. मात्र सर्वांचे त्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. ही बाब गंभीर असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- वैष्णवी सरफरे, माजी नगरसेविका
>चिरडले जाण्याची भीती
मी भांडुपमध्ये पनवेलहून नोकरीसाठी लोकलनेच ये-जा करतो. अशात रेल्वे स्थानकातून गर्दीच्या वेळी बाहेर पडणे मुश्कील होते. त्यातून जरी बाहेर पडलो तर खरी कसरत ही स्थानकातून बाहेर पडताना होते. यापूर्वी काही दुर्घटना घडल्या आहेत.
- प्रमोद बांदेकर, रेल्वे प्रवासी
असला प्रवास नको रे बाबा...
एल्फिन्स्टन येथील चेंगराचेंगरी प्रकरणानंतर भांडुप रेल्वे स्थानकातून बाहेर पडेपर्यंत प्रवास नकोसा वाटतो. मात्र पर्याय नसल्याने येथूनच ये-जा करावी लागते. येथे लवकरच दुसरी वाट काढणे गरजेचे आहे.
- प्रियांका शिंदे, रेल्वे प्रवासी
>सूचना, तक्रारी, व्हिडीओ
‘लोकमत’च्या वाचकांच्या ‘मुंबईचा ºहास आता बास’ या मालिकेसंदर्भात काही सूचना, प्रतिक्रिया असल्यास
८८४७७४१३०१
या क्रमांकावर कळवाव्या. लोकल स्थानकांच्या तक्रारीही या क्रमांकावर पाठवता येतील. स्थानकांतील समस्यांचे व्हिडीओदेखील वाचक या क्रमांकावर पाठवू शकतात.
>पाठपुरावा सुरू
गेल्या अनेक दिवसांपासून भांडुप रेल्वे स्थानकाच्या दुसºया वाटेसाठी पाठपुरावा सुरू आहे. स्थापत्य समितीत लेखी अर्जही केला. खासदाराच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. अनेक आंदोलने छेडली. स्थापत्य समिती अध्यक्ष या ठिकाणी पाहणी करणार होते. मात्र अजून काहीच नाही. प्रशासनाने हे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
- साक्षी दीपक दळवी, नगरसेविका

Web Title: Bhupukh breathed his breath, and when will the railway station double the question?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.