- गौरी टेंबकरमुंबई - भुरट्या चोराने पालिकेतच डल्ला मारल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. आरोपीने कीटक नियंत्रण खात्याची एक शिडी घेऊन पळ काढला आहे. या विरोधात पालिकेच्या पी/दक्षिण विभागाने गोरेगाव पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार निवास चावरे (५५) हे पालिकेच्या पी दक्षिण विभाग कार्यालयात असलेल्या कीटक नियंत्रण खात्यात कनिष्ठ आवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या ऑफिस अंतर्गत येणारी कीटक नियंत्रण चौकी ही गोरेगाव रेल्वे स्टेशन येथील ग्रामपंचायत रोड परिसरात आहे. त्यालाच लागून या कामासाठी लागणारे संबंधित साहित्य ठेवण्याचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये ॲल्युमिनियमची शिडी, कीटकनाशक फवारणी पंप, धूर फवारणी मशीन, डिझेल तसेच पेट्रोल असे साहित्य असते. यावर इतर २ कनिष्ठ आवेक्षक मिळून तिघांचे नियंत्रण असते. दरम्यान २७ डिसेंबर रोजी तक्रारदार गोडाऊनमध्ये गेले. तेव्हा सदर साहित्य ठरवलेल्या गोडाऊनवर असलेले सिमेंटचे पत्रे त्यांना तुटलेल्या अवस्थेत दिसले. तेव्हा त्यांनी सगळे साहित्य पडताळून पाहिले. तेव्हा एकूण साहित्यापैकी अल्युमिनियमची १२ फुटाची शिडी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याची माहिती त्यांनी वरिष्ठ कीटक नियंत्रण अधिकाऱ्यांना देत याप्रकरणी तक्रार करण्यासाठी गोरेगाव पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३८०, ४६१ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून चोराचा शोध सुरू आहे.