Join us

भुऱ्यानं मुख्यमंत्र्यांना समजावली 'लोकशाही', CM ने घेतली उपचाराची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 7:58 PM

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर भुऱ्या नावाच्या विद्यार्थ्याची सर्वत्र चर्चा आहे.

मुंबई/जालना - लोकशाहीची व्याख्या आपण लहानपणी शाळेत शिकतच असतो. पण, लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही हीच व्याख्या आपणास माहिती आहे. मात्र, यंदाच्या प्रजासत्ताक दिनी भाषण करतानाचा एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून काहीजण पोट धरुन हसत आहेत, तर काहीजण या विद्यार्थ्याच्या लोकशाहीच्या व्याख्येचं कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे चिमुकल्या भुऱ्याची लोकशाही मुख्यमंत्र्यांनाही आवडली. म्हणूनच जालना दौऱ्यावर असताना भुऱ्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी, भुऱ्या उर्फ कार्तिकला असलेल्या दृष्टीदोषाचीही माहिती शिंदेंना मिळाली. 

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर भुऱ्या नावाच्या विद्यार्थ्याची सर्वत्र चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनीही भुऱ्याची भेट घेत कौतुक केलं होतं. तसेच या मुलाला आपल्या घरी बोलावून त्याचं भाषण ऐकलं. आता, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर असताना त्यांनी अंबड तालुक्यातील रेवलगावच्या जिल्हा परिषद शाळेतील भुऱ्याची वाटूर येथे भेट घेतली. 

मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी कार्तिकच्या लोकशाही विषयावरील भाषणाकरिता अभिनंदन करीत त्याचे मनापासून कौतुक केले. या भेटीमध्ये कार्तिकला दूरदृष्टीचा दोष आहे, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्याच्या डोळ्यांवरील उपचाराची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत घेण्यात आल्याचेही शिंदे यांनी जाहीर केले. तसेच, लवकरात लवकर कार्तिकला ज्येष्ठ नेत्र चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे नेत्र तपासणीसाठी मुंबईत आणण्यात येणार असून त्याच्यावर मुंबईतील सर्वोत्तम रुग्णालयात उत्तमोत्तम उपचार करण्यात येणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

राजेश टोपेंनी केला सत्कार 

राजेश टोपे म्हणाले, “महाराष्ट्रभर गाजत असलेल्या भुऱ्या उर्फ कार्तिक वजीर या माझ्या मतदारसंघातील विद्यार्थ्याला मी घरी बोलवून त्याचे भाषण ऐकले आणि त्याचा सत्कार केला.” 

टॅग्स :जालनालोकशाहीमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे