लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर आणि ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी या तीन जणांच्या नावांचे पॅनल राज्य सरकारने मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविले. आयोग त्यावर बुधवारी दुपारी निर्णय घेण्याची शक्यता आहे.
गगराणी हे महापालिका आयुक्तपदासाठी सर्वांत प्रबळ दावेदार मानले जातात; पण आता त्यांच्यासोबतच आणखी दोन अधिकाऱ्यांची नावे पाठविण्यात आल्याने आयोग कोणत्या नावाला मंजुरी देणार याबाबत उत्सुकता आहे. सूत्रांनी सांगितले की, कोणतेही एक नाव न पाठवता तीन नावांचे पॅनल पाठवावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली होती.
सध्याचे आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व पी. वेलारसू यांची बदली करावी आणि त्यांच्या जागी नवीन नियुक्ती मंगळवारी सायंकाळपर्यंत करावी, असे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने आयुक्तपदासाठी गगराणी, डिग्गीकर व मुखर्जी यांची नावे सुचविलेली आहेत. त्यावर आयोग बुधवारी निर्णय घेईल. भिडे यांची बदली करण्यात आली, तर वेलारसू हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच चहल यांच्या बाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही.