भूषण गगराणी यांच्याकडे BMC आयुक्तपदाची धुरा; नवी मुंबई, ठाण्यालाही मिळाले नवे आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 03:35 PM2024-03-20T15:35:45+5:302024-03-20T15:36:18+5:30
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने मंगळवारी आयोगाकडे आयुक्तपदासाठी तीन नावांचे पर्याय पाठवले होते.
Bhushan Gagrani ( Marathi News ) : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल कठोर निर्णय घेत ज्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे त्यांना हटवण्याचे आदेश दिले होते. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने मंगळवारी आयोगाकडे आयुक्तपदासाठी तीन नावांचे पर्याय पाठवले होते. सरकारने पाठवलेल्या तीन नावांपैकी केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व पी. वेलारसू यांची बदली करावी आणि त्यांच्या जागी नवीन नियुक्ती मंगळवारी सायंकाळपर्यंत करावी, असे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने आयुक्तपदासाठी गगराणी, डिग्गीकर व मुखर्जी यांची नावे सुचविलेली होती. त्यावर आयोगाने आज निर्णय घेत भूषण गगराणी यांची आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
सरकारने कोणती तीन नावे पाठवली होती?
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, 'बेस्ट'चे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर आणि 'एमएमआरडीए'चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी या तीन जणांच्या नावांचे पॅनल मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवले होते. कोणतेही एक नाव न पाठवता तीन नावांचे पॅनल पाठवावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली होती. मात्र भूषण गगराणी हेच महापालिका आयुक्तपदासाठी सर्वांत प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यावर आज आयोगानेही शिक्कामोर्तब करत गगराणी यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान, भूषण गगराणी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिवपद सांभाळले होते. तसंच उद्धव ठाकरे सरकारमध्ये कोरोना काळात खूप मोठी जबाबदारी पार पाडली होती. यामुळे शिंदे सरकारच्या काळात त्यांच्यावर अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
नवी मुंबई आणि ठाण्यातही नवीन आयुक्तांची नियुक्ती
केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांना हटवण्याचे आदेश दिल्यानंतर आता ठाणे आणि नवी मुंबईतही नवीन महापालिका आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे महापालिका आयुक्तपदाची धुरा सौरभ राव यांच्यावर तर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाची जबाबदारी कैलास शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.