मुंबई : मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या हकालपट्टीनंतर नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी नेमलेल्या शोध समितीत सरकारी प्रतिनिधी म्हणून भूषण गगरानी यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय परिषदेच्या सदस्यांपैकी एका सदस्याची निवड लवकरच करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी सांगितले. तसेच मेरिट ट्रॅक कंपनीची गच्छंती करण्याचे संकेतही दिले.निकालाची ऐशीतैशी करणाºया मेरिट ट्रॅक कंपनीविरोधात राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने तयार केलेला अहवाल उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यपालांना पाठवल्याची माहिती तावडे यांनी दिली. यासंदर्भात नवे कंत्राट काढण्याचा विचार असून, त्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक असल्याचे तावडे यांनी या वेळी सांगितले. कंपनीच्या गच्छंतीच्या निर्णयामुळे विद्यापीठ परीक्षांचे आॅनलाइन मूल्यांकन यापुढेही सुरूच राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. पुन्हा निकालात गोंधळ होऊ नये, म्हणून अनेक नव्या सूचना विद्यापीठाने मेरिट ट्रॅक कंपनीला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नव्या कंत्राटाबाबत त्यांनी वाच्यता केल्याने मेरिट ट्रॅक कंपनीची गच्छंती निश्चित मानली जात आहे.विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांची नियुक्ती तुर्तास टळली आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पूर्ण होईपर्यंत नेटके यांची नियुक्ती करू नये, अशी विनंती मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बी.ए. चोपडे यांनी राजभवनास केली होती. परिणामी, आणखी काही दिवस घाटुळे यांच्याकडे ही जबाबदारी असेल.
कुलगुरू निवड समितीवर भूषण गगरानी; मेरिट ट्रॅकचीही गच्छंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 6:03 AM