'त्या' शेतकरी अन् कामगारांच्या मुलांसाठी भूषणसिंहराजे होळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:48 AM2021-05-11T08:48:15+5:302021-05-11T08:49:27+5:30
राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन, सर्वच चाचण्यांवर पास होऊन जवळपास 413 विद्यार्थ्यांनी अधिकारीपदाला गवसणी घातली आहे.
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाज बांधवांनी या निर्णयानंतर आपली नाराजी व्यक्त केली आहे. सध्या, राज्यात लॉकडाऊन असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला जात आहे. मात्र, मराठा आरक्षणामुळे रखडलेल्या नियुक्त्या आणि भरती प्रक्रियेला आता गती देण्याची मागणी करण्यात येत आहे. राज्यात एमपीएससी परीक्षेतून उपजिल्हाधिकारी, तहसीलदारसह इतर पदांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्याची मागणी भूषणसिंहराजे होळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन, सर्वच चाचण्यांवर पास होऊन जवळपास 413 विद्यार्थ्यांनी अधिकारीपदाला गवसणी घातली आहे. लाखोंच्या गर्दीतून मेहनतीच्या आणि कष्टाच्या जोरावर या विद्यार्थ्यांची गतवर्षीच अधिकारी पदी निवड झाली आहे. मात्र, अद्यापही या तरुणांना नियुक्ती मिळाली नाही. विशेष म्हणजे 5 ते 6 वर्षे संघर्ष करुन, स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करुनही अद्याप प्रतिक्षाच त्यांच्या पदरी पडली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्याने यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. मात्र, आता आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला आहे. त्यामुळे, या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात याव्यात, असे पत्र होळकरांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी मुख्यमंत्र्या्ंना लिहिले आहे.
#MPSC_2019_Joining_of_365#MPSC_2019_Justice_for_OBC_NT_VJ_SC_ST_OPEN_Minoritieshttps://t.co/ZLgJZ7g8Z8
— MAYUR (@mtbansode611) May 10, 2021
एमपीएससी परीक्षेतून पास झालेल्या 413 उमेवारांमध्ये 48 हे एसईबीसी प्रवर्गातून आले आहेत. मात्र, 48 विद्यार्थ्यांमुळे इतर समाजातील 365 म्हणजे 87 टक्के उमेदवारांवर अन्याय होत आहे. विशेष म्हणजे मराठा समाजीतील 72 उमेदवार जे खुल्या प्रवर्गातून पास झाले आहेत, त्यांच्यावरही अन्याय होत आहे. त्यामुळे, या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात याव्यात अशी मागणी होळकर यांनी केली आहे. तसेच, अतिशय संघर्षातून ही शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांची मुले यशस्वी झाली आहे. त्यांनी, व त्यांच्या आई-वडिलांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं आहे. मात्र, निुयक्त्या न मिळाल्याने अद्यापही त्यांचं स्वप्न अपूर्ण आहे. तरी, आपण लवकरात लवकर यांना नियुक्त्या द्याव्यात, असे पत्र भूषणराजे होळकर यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंना लिहिले आहे.
आदित्य ठाकरेंप्रमाणेच तत्परतेनं नियुक्ती करा
ज्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्वरित आदित्य ठाकरे यांची मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याच तत्परतेने महाराष्ट्रातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे एमपीएससी परीक्षेत खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या 76 विद्यार्थ्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पुढेही आरक्षण न टिकल्यास या जागांचं काय करायचं? इतर सर्व मागासवर्गीय, NT, SC, ST प्रवर्गातील 365 युवकांना अजून नियुक्ती नाही. यांना नियुक्या मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार असूनही सरकार टाळाटाळ करत आहे. याचा उद्रेक झाल्यास हे महाविकास आघाडी सरकारचं पाप ठरेल, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.