मुंबई - मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरून महिनाभरात ६ लाख ३३ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही मेट्रो मार्गिका सुरू होऊन एक महिना उलटला, तरीही या मेट्रोची दररोजची प्रवासीसंख्या सरासरी २० हजार एवढीच राहिली आहे. यामुळे मेट्रोची प्रवासीसंख्या वाढणार कधी, असा प्रश्न विचारला जात आहे.
कुलाबा ते आरे मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ ऑक्टोबरला लोकार्पण झाले. ७ ऑक्टोबरपासून मेट्रोचा आरे ते बीकेसी हा १२.६९ किमी लांबीचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. पहिल्या दिवशी या मेट्रो मार्गिकेवरून १८ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. मात्र, महिना उलटल्यानंतरही मेट्रोच्या प्रवासीसंख्येत फारसा बदल झाला नाही. सद्य:स्थितीत गेल्या महिनाभरात सरासरी दरदिवशी २० हजार ४२६ प्रवाशांकडून मेट्रोतून प्रवास केला जात आहे. या मेट्रोने आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासीसंख्या ही १३ ऑक्टोबरला गाठली होती. या दिवशी मेट्रो ३ मधून २७,१०८ प्रवाशांनी प्रवास केला होता, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली.
४ लाख प्रवासी गाठण्याचे आव्हान मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यावरून दरदिवशी ४ लाख प्रवासी प्रवास करतील, असा एमएमआरसीचा अंदाज आहे. ही मार्गिका सुरू होऊन एक महिना झाला, परंतु प्रवासीसंख्येत फारशी वाढ झालेली दिसत नाही. त्यामुळे या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या मार्गावर ४ लाख प्रवासीसंख्येचा आकडा गाठण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या मार्गिकेसाठी तब्बल ३७ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.