Join us

वाहतूक पोलिसांची पक्षपाती कारवाई

By admin | Published: November 05, 2014 4:05 AM

सानपाडा रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करताना पक्षपातीपणा केला जात आहे. येथील हॉटेलसमोर अनधिकृत वाहनतळ सुरू झाला आहे.

नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करताना पक्षपातीपणा केला जात आहे. येथील हॉटेलसमोर अनधिकृत वाहनतळ सुरू झाला आहे. स्टेशन इमारतीमधील कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर सदर ठिकाणी कारवाई होत असून हॉटेलमधील ग्राहकांना मात्र अभय मिळू लागले आहे. सानपाडा रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला सिडकोने पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध केली आहे. नागरिकांसाठी दोन वाहनतळ आहेत. स्टेशन इमारतीमधील कार्यालयांमध्ये काम करणाऱ्यांसाठी एक वाहन तळ आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी स्टेशनच्या तळमजल्यावर हॉटेल सुरू झाले आहे. हॉटेलच्या समोरील जागेवर अनधिकृतपणे वाहनतळ सुरू केला आहे. त्यासाठी सिडकोने केलेला संरक्षण कठडा तोडण्यात आला आहे. दिवसभर हॉटेलसमोर १० ते १२ मोटारसायकल उभ्या असतात. रात्री २० ते २५ चारचाकी वाहने उभी केली जातात. परंतु आता या मोटारसायकलवर वाहतूक पोलिस कारवाई करत आहेत. परंतु हॉटेलमधील ग्राहकांच्या वाहनांवर मात्र कारवाई होत नसल्याने कारवाई नक्की कोणाच्या आदेशावरून होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांकडून रेल्वे स्टेशनच्या हद्दीत जाऊन कारवाई केली जात आहे. रोड व पदपथांवर उभी नसलेल्या वाहनांवर कारवाई का याचे उत्तर मात्र पोलिस देत नाहीत. तुर्भे पोलिस स्टेशनच्या हद्दीत कारवाई न करता रेल्वे स्टेशन समोरील रोडच्या आतील भागात कारवाई करण्याचा उद्देश काय असा सवाल नागरिकांकडून केला जात आहेत. वाहतूक पोलीस कोणाच्या आदेशाने कारवाई करत आहेत, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. तर परिसरात कारवाई केलेल्या वाहनांवर दंड आकारला जात नसल्याने वाहनधारकांना मनस्ताप देण्याचा प्रकार वाहतूक शाखेकडून केला जात आहे. (प्रतिनिधी)