ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबईत सायकल अॅम्बुलन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 05:25 AM2018-09-12T05:25:19+5:302018-09-12T05:25:21+5:30
मुंबईत वृद्धांच्या सुश्रुषेसाठी सायकल अॅम्बुलन्स सुरु करण्यात येणार असून विलेपार्ले पूर्व व शिवाजी पार्क या भागाची त्यासाठी निवड केली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ही माहिती दिली.
मुंबई : मुंबईत वृद्धांच्या सुश्रुषेसाठी सायकल अॅम्बुलन्स सुरु करण्यात येणार असून विलेपार्ले पूर्व व शिवाजी पार्क या भागाची त्यासाठी निवड केली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ही माहिती दिली.
मुंबईत आतापर्यंत २० बाईक अॅम्बुलन्स सुरु करण्यात आल्या आहेत.याच धर्तीवर मुंबई शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या (जेरियाट्रिक) सुश्रुषेसाठी सायकल अॅम्बुलन्स ही नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. वृद्धांना अनेक शारीरिक समस्या भेडसावतात. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्या प्रकृतीची तपासणी, रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात आहे की नाही याची तपासणी पॅरामेडिकलच्या माध्यमातून करण्यासाठी सायकल अॅम्बुलन्स सेवा उपयुक्त ठरणार आहे. मुंबईत विलेपार्ले पूर्व आणि शिवाजी पार्क या भागाची प्राथमिक स्तरावर निवड केली असून तेथे ही सेवा सुरु करण्यात येईल. या दोन्ही भागात प्रत्येकी २५ सायकल अॅम्बुलन्स देऊन पॅरामेडिकलच्या माध्यमातून वृद्धांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतील.
बाईक अॅम्बुलन्सप्रमाणे सायकल अॅम्बुलन्सची रचना असून प्रशिक्षित पॅरामेडिकल या अॅम्बुलन्सचा चालक असेल. या सेवेसाठी एक बेस स्टेशन करून तेथून ज्येष्ठांशी संवाद साधला जाईल.