मेट्रो स्थानकाबाहेरील सायकल सेवेचा ५०९ प्रवाशांकडून वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 01:23 AM2020-03-03T01:23:44+5:302020-03-03T01:24:08+5:30
मेट्रो स्थानकापासून थेट घर किंवा कार्यालय गाठण्यासाठी सुरू केलेल्या सायकल सेवेला मुंबईकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई : मेट्रो स्थानकापासून थेट घर किंवा कार्यालय गाठण्यासाठी सुरू केलेल्या सायकल सेवेला मुंबईकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सेवेला सुरुवात झाल्यावर आठवड्याभरामध्येच तब्बल ५०९ जणांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे, वाहतूककोंडीतून सुटका आणि प्रवास खर्चामध्ये बऱ्यापैकी बचत होत असल्याने आणि थेट घर किंवा कार्यालयापर्यंत प्रवास करता येत असल्याने, प्रवाशांकडून सायकल सेवेला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरदिवशी सायकलच्या वापरामध्ये वाढ होत आहे.
मेट्रो-१ मार्गावरील वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर असलेल्या जागृतीनगर स्थानकात सायकल सेवेला रविवारपासून सुरुवात झाली आहे. एमएमआरडीए आणि माय बाइक यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार सध्या या स्थानकात पहिल्या टप्प्यात ५० सायकली उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे उद्घाटनाच्या दिवशीच प्रवाशांनी कुतूहल म्हणून सायकली भाड्याने घेतल्या. मात्र, आता या सायकली प्रवाशांची गरज बनल्या असल्याने, टप्प्याटप्प्याने अधिक सायकली उपलब्ध करण्याचा विचार माय बाइक कंपनीकडून सुरू करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
दरदिवशी या योजनेला प्रतिसाद वाढत आहे. उर्वरित स्थानकांवरही लवकरच ही योजना सुरू करण्यात येणार आहे. उर्वरित मेट्रो स्थानकांवरही ही योजना सुरू झाल्यावर आमचा उद्देश पूर्ण होईल. मुंबईकर या योजनेला चांगला प्रतिसाद देत असून, ते या योजनेला स्वीकारत असल्याचे माय बाइकचे संस्थापक अर्जित सोनी यांनी सांगितले.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जागृतीनगर हे एकच मेट्रो स्थानक निवडले असून, सध्या पन्नास सायकली उपलब्ध आहेत. लवकरच मेट्रो-१ मार्गावरील सर्व स्थानकांसाठीदेखील ही सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सायकल एका ठिकाणाहून घेऊन दुसºया ठिकाणी जमा करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास प्रतिसादात वाढ होईल. सध्या केवळ एकच स्थानक आणि एकच सायकल स्टॅण्ड असला, तरी प्रवाशांच्या प्रतिसादानुसार इतर स्थानके आणि काही महत्त्वाच्या ठिकाणी सायकल सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
>दरपत्रक
प्रतितास दोन रुपये
साप्ताहिक पास २८० रुपये
मासिक पास ९०० रुपये
दोन महिन्यांच्या पासवर एक महिना मोफत
साप्ताहिक आणि मासिक पास घेतल्यास सायकल मुक्कामी घेऊन जाण्याची मुभा.
माय बाइक या अॅपच्या वॉलेटमध्ये किमान पाचशे रुपये शिल्लक असणे गरजेचे आहे.