वर्सोवा मेट्रो स्थानक येथे सेवा सुरू
भाड्याने मिळणार सायकल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रवाशांचा प्रवास अधिक पर्यावरणपूरक व्हावा म्हणून आता सायकलचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो मार्गाच्या वर्सोवा मेट्रो स्थानक येथे आता भाडे तत्त्वावरील सायकल सेवा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना एका तासासाठी केवळ दोन रुपये या दराने सायकल भाड्याने घेता येणार आहे. साप्ताहिक/ मासिक भाड्याने सायकल देण्याची योजनादेखील उपलब्ध आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी शनिवारी या सेवेचे उद्घाटन केले. यावेळी राजीव म्हणाले की, एमएमआरमध्ये एक सोपा आणि पर्यावरणास अनुकूल प्रवासी नेटवर्क विकसित करणे हे आमचे लक्ष्य आहे. या उपक्रमाच्या सुरक्षेसाठी या सायकल जीपीएस लोकेशन ट्रॅकरने युक्त आहेत.
एमएमआरडीएच्या भागीदारीत ही सुविधा शहरातील इतर मेट्रो स्थानके आणि विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करत आहे. यामुळे लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीचा अविभाज्य भाग म्हणून प्रवासी नेटवर्क तयार करण्यात आम्हाला मदत होईल. एमएमआरडीएने नेहमीच विविध संस्थांना असे परवडणारे व पर्यावरणपुरक लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी प्रोग्राम विकसित करण्यासाठी भागीदारी करण्यास प्रोत्साहन दिले आहे, असेही राजीव यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, आता वर्सोवा येथे ही सायकल सेवा सुरू झाली असतानाच पुढील काळात मेट्रोच्या इतर स्थानकातदेखील ही सेवा सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. तर मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला स्थानकातून फेब्रुवारी महिन्यात इ-बाईकची सुविधा सुरू होणार आहे.