Join us

मुंबईतही हवी सायकल चळवळ; मेट्रो स्टेशनबाहेर उभारणार सायकल स्टॅण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 2:15 AM

मुंबईची वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी आता एमएमआरडीए सज्ज झाली आहे. मुंबईतील बिघडलेली वाहतूक, रेल्वेमधली गर्दी, वाढते ट्रॅफिक जाम, इंधनाचे वाढते दर, यांवर मात करण्यासाठी आता एमएमआरडीए प्राधिकरण प्रयत्न करणार आहे.

मुंबई : मुंबईची वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी आता एमएमआरडीए सज्ज झाली आहे. मुंबईतील बिघडलेली वाहतूक, रेल्वेमधली गर्दी, वाढते ट्रॅफिक जाम, इंधनाचे वाढते दर, यांवर मात करण्यासाठी आता एमएमआरडीए प्राधिकरण प्रयत्न करणार आहे. यासाठी मुंबई शहरात सायकल चळवळ राबविण्याची तयारी एमएमआरडीएकडून केली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, एमएमआरडीएने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी याचे सूतोवाच केले.आर.ए. राजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेन्मार्कची राजधानी असलेले कोपनहेगन हे शहर सायकलस्वारांचे शहर म्हणून ओळखले जाते. तेथील ५२ टक्के लोकसंख्या कामावर जाण्यास सायकलचा वापर करते. या ठिकाणी कमी प्रमाणात वाहनांचा उपयोग केल्याने वाहतुकीच्या समस्याही कमी असून, शहरात आरोग्यदायी वातावरणही असते. अशाच प्रकारे मुंबईकरांनीही सायकलचा वापर मोठ्या प्रमाणावर केल्यास, मुंबईतही ही फलदायी परिस्थिती येऊ शकते, असा विश्वास आर.ए. राजीव यांना आहे.या समस्येवर मात करण्यासाठी एमएमआरडीए शहरात सायकल चळवळ राबविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शहरातील मेट्रो स्थानकांबाहेर यासाठी सायकल स्टॅण्ड उभारण्यात येणार आहेत. मुंबईकरांनी या उपक्रमास साथ दिल्यास, बाइक शेअरिंगचा पर्यायही एमएमआरडीएच्या विचाराधीन आहे. या प्रणालीमध्ये मेट्रो स्थानकांच्या परिसरात पार्किंग सुविधेसोबतच बाइक स्टेशन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, सायकल चळवळीला अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यास, सेल्फ-ड्रिव्हन-सायकल-कॅब या संकल्पनेचाही भविष्यात विचार करण्यात येणार आहे. यात मेट्रो स्टेशन ते इच्छित स्थळी जाण्याकरिता आणि तेथून परत येण्याकरिता बाइक सायकलचा पर्याय एमएमआरडीएकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.मुंबईतील वाहतूक सुविधा सुधारायची असेल, तर सायकल चळवळीस चालना देणे अत्यंत गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत, त्याकडे आपण कानाडोळा करू शकत नाही. चीन, जपानसारख्या देशांमध्येही ५० टक्क्यांहून जास्त नागरिक सायकलचा वापर करीत आहेत. याचा प्रसार मुंबईकरांमध्ये होेण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्नशील आहे आणि त्याचसाठी सायकल चळवळीला एमएमआरडीए प्रोत्साहन देणार आहे.- आर. ए. राजीव, आयुक्त, एमएमआरडीए

टॅग्स :मुंबई